झोपेतून जागे व्हा नगरकरांनो.! विकास फलकांवर नाही, रस्त्यावर दिसायला हवा.!


अहिल्यानगर शहराची आजची अवस्था पाहिली तर 'पुण्यापेक्षाही वाईट परिस्थिती' असे म्हणावे लागेल. शहरभर खड्डे, अर्धवट बुजवलेले स्पीड ब्रेकर, विस्कळीत वाहतूक व्यवस्था आणि गर्दीच्या वेळी अपुऱ्या ट्रॅफिक उपाययोजना, हीच आजची वास्तव स्थिती आहे.


कोट्यवधी रुपयांचा विकास फक्त फ्लेक्स आणि जाहिरात फलकांपुरताच मर्यादित राहिल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे. शहरातील अनेक चौकांवर अद्याप आधुनिक ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नाही.

परिणामी कॉलेज तरुण, युवकांना विना मोबदला तासन्‌तास ट्रॅफिक नियंत्रणासाठी उभे राहावे लागते. हा तात्पुरता उपाय असू शकतो, पण तो कायमस्वरूपी व्यवस्था ठरू शकत नाही. अपघातांचे वाढते प्रमाण ही याच व्यवस्थेची थेट परिणती आहे.

एखाद्या कुटुंबातील कर्ता तरुण अपघातात गेला किंवा उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले, तर त्या कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त होते, याची जाणीव सत्ताधाऱ्यांना आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.

अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्यालय असूनही संगमनेर, लोणी, शिर्डी, श्रीरामपूर, कोपरगाव यांसारख्या तालुक्यांच्या तुलनेत शहर मागे पडत चालले आहे. पुणे शहरात मध्यवर्ती भागातून सिटी बस सेवा सुरळीत चालू शकते, तर नगरमध्ये लहान आकाराच्या सिटी बस सेवा सुरू करण्यास अडचण काय?

३ नं. स्टॅन्ड ते शेंडी (तारकपूर स्टॅन्ड मार्गे) सिटी बस सुरू करणे म्हणजे सामान्य जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद मिळवण्यासारखे आहे. या मार्गावर महत्त्वाची शासकीय कार्यालये, दाट लोकवस्ती, लॉन्स, मंगल कार्यालये आहेत, हे जणू सगळेच विसरले आहेत.

राजकीय पक्षांवरही नागरिकांचा रोष आहे. पक्ष कोणताही असो, भ्रष्टाचारामुळे पुढील पिढ्यांसाठी कमाई करण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू असल्याचा आरोप उघडपणे केला जात आहे. 'मरावे परी कीर्ती रूपे उरावे' हे धोरण स्वीकारले तरच खरा विकास शक्य आहे.

अहिल्यानगर–पुणे–पिंपरी चिंचवड स्वस्त, मस्त, अतिवेगवान लोकल रेल्वे सेवा तात्काळ सुरू करण्याची गरज आहे. अनेक ठेकेदार नेमून, फ्री मेंटेनन्सच्या करारासह काम सुरू झाले तर अपघातांचे प्रमाण कमी होईल, वेळ व पैसा वाचेल.

एसटी व लक्झरी बस रेल्वे स्टेशनपर्यंतच मर्यादित ठेवल्यास २४ तास लोकल सेवा शक्य आहे. आज गरज आहे ती सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आत्मचिंतन करण्याची आणि झोपेतून जागे होण्याची. अन्यथा सामान्य जनता आणि मतदार वाऱ्यावरच राहतील, आणि जिल्हा मुख्यालय असलेले अहिल्यानगर मागेच पडत राहील.

- संजय बारस्कर, अहिल्यानगर
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !