रांगेतील प्रतीक्षा आता होणार आनंददायी, 'वाचन बॉक्स'ची अभिनव संकल्पना


​शेवगाव (अहिल्यानगर) - दवाखाने (Hospital), सलून (Saloon) किंवा टेलरिंगच्या दुकानांमध्ये नंबर येईपर्यंत वाट पाहताना कंटाळा आला की आपण नको त्या गोष्टी, विशेषतः मोबाईलमध्ये डोकवून वेळ घालवतो. मात्र, आता शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात प्रतीक्षेचा हा वेळ 'वाचनानंदात' बदलणार आहे.

शेवगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी व 'उमेद वाचन चळवळी'चे प्रणेते डॉ. शंकर गाडेकर यांनी 'वाचन बॉक्स' (Readers Box) ही अभिनव संकल्पना राबवून मोबाईलपासून दुरावत चाललेल्या वाचनाला पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

​काय आहे 'वाचन बॉक्स'? - प्रतीक्षा करणाऱ्या लोकांच्या हातातील मोबाईलचा वेळ कमी करून त्यांना पुस्तकांशी जोडणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

डॉ. गाडेकर यांनी आपल्या मित्रपरिवार व शिक्षकांच्या मदतीने बोधेगावमधील तीन रुग्णालये, एक सलून आणि एका टेलरिंग दुकानात हे खास 'वाचन बॉक्स' बसवले आहेत.

या पेटीत कथासंग्रह, ललित लेख, दिवाळी अंक आणि मासिके अशी साधारण १० निवडक पुस्तके (Books) ठेवलेली असतात. रांगेत उभे असलेले लोक सहजपणे हे पुस्तक हातात घेऊन वाचू शकतात.

कमी वेळेतही एखादे पुस्तक चाळून वाचकांची त्यातील आशयाविषयी उत्सुकता वाढावी आणि पुढे ती पूर्ण वाचावी, अशी या उपक्रमाची (Project) रचना आहे. 

यासंदर्भात डॉ. शंकर गाडेकर म्हणाले, मोबाईलच्या अनावश्यक वापरावर 'वाचन बॉक्स' हा एक उत्तम आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो. वाचन चळवळ सहज व सोप्या पद्धतीने जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.

गावातील गर्दीच्या सर्वच ठिकाणी लोकसहभागातून असे बॉक्स बसवण्याचा आमचा मानस आहे. ​या उपक्रमाला गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद (Response) मिळत आहे.

'प्रत्येक हातात पुस्तक' हे ध्येय घेऊन काम करणाऱ्या डॉ. गाडेकर यांना या कार्यात प्रमोद कातकडे, चंद्रशेखर पाटील, अमोल कांबळे, अर्जुन घुले, पूनम राऊत, मेनका ढाकणे आणि अंजली चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

मोबाईलच्या जगात हरवलेल्या माणसाला पुन्हा पुस्तकांच्या विश्वात (World of Books) आणण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !