नेवासा (अहिल्यानगर) - अवैध वाळू उपशाने (Illegal Sand Mining) पोखरलेल्या मुळा-प्रवरा नदीपात्रात काल महसूल विभागाने वाळू तस्करांच्या अक्षरशः मुसक्या आवळल्या आहेत. जिल्हाधिकारी (District Magistrate) डॉ. पंकज आशिया यांच्या आदेशानंतर नेवासा (Newasa) महसूल विभागाने 'नेवासा बुद्रुक' येथे धडक कारवाई केली आहे.
तब्बल २८ लाख रुपये किमतीचे ७० अवैध तराफे (चप्पू) जप्त करून जाळून खाक (Burned) केले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांचे (Sand Mafia) धाबे दणाणले आहेत.
१४ तास चालले 'सर्च ऑपरेशन' : मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी तहसीलदार हिमालय घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली हे विशेष ऑपरेशन (Search Operation) राबवण्यात आले.
११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही मोहीम चक्क मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू होती. तब्बल १४ तास चाललेल्या या थरारक कारवाईत महसूल पथकाने नदीपात्राचा कोपरा अन् कोपरा पिंजून काढला.
श्रीरामपूरची 'विशेष बोट' आणि कारवाईचा धडाका : वाळू उपसा करण्यासाठी तस्करांनी नदीच्या खोल पात्रात तराफे लपवून ठेवले होते. यावर मात करण्यासाठी प्रशासनाने श्रीरामपूर येथून खास बोट (Boat) आणि विशेष पथक (Spacial Squad) पाचारण केले होते.
या पथकाच्या मदतीने नदीपात्रात शोध घेऊन ७० तराफे बाहेर काढण्यात आले. एका तराफ्याची किंमत सुमारे ४० हजार रुपये असून, एकूण २८ लाखांचा मुद्देमाल प्रशासनाने जागेवरच आगीच्या हवाली केला. आकाशात झेपावणाऱ्या आगीच्या ज्वाळांनी अवैध उपसा करणाऱ्यांना प्रशासकीय इशाऱ्याची धग पोहोचवली.
प्रशासनाचा कडक इशारा : पर्यावरणाचा ऱ्हास करणारे अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाळू तस्करी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही वाळू तस्करांविरुद्ध प्रशासनाची करडी नजर असेल. जे कुणी पर्यावरणाचे नुकसान करतील, त्यांच्यावर यापेक्षाही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. - महसूल विभाग, नेवासा.
या कारवाईत महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस (Police) पथकाचा मोठा फौजफाटा तैनात होता. या धडाकेबाज कामगिरीमुळे नेवासा परिसरातून प्रशासनाचे कौतुक होत आहे.
