येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - विश्वकर्मीय बांधवांचे आराध्य दैवत आणि सृष्टीचे शिल्पकार प्रभू भगवान विश्वकर्मा (Vishwakarma) यांची जयंती जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्हयातील विविध तालुक्यांमध्ये धार्मिक कार्यक्रम, अखंड हरिनाम सप्ताह आणि समाज मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार (Kharwandi Kasar) येथील श्रीक्षेत्र विश्वकर्मा गड (दुरंतेकडी) येथे जयंतीनिमित्त ५ दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे (Harinam Saptah) आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे मुख्य आकर्षण युवा कीर्तनकार ह.भ.प. वैष्णवी महाराज मोरे यांचे शिवकथा (Shivkatha) निरूपण ठरले. पाच दिवस चाललेल्या या कथेने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
समाप्ती समारंभास विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख भगवान राऊत, विभागीय अध्यक्ष राजकुमार राऊत, जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर, जिल्हा सचिव अशोक गोरे, जिल्हा संपर्कप्रमुख गोकुळ गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष आदिनाथ भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विश्वकर्मा सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेवगाव (Shevgaon) येथील स्वराज मंगल कार्यालयात (Swaraj Mangal Karyalay) सुतार (Sutar) आणि लोहार (Lohar) समाज बांधवांच्या वतीने संयुक्तपणे जयंती साजरी करण्यात आली. सकाळी भगवान विश्वकर्मा यांचे विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर लाड, नगरसेवक संजय फडके, ताहेर पटेल, नायब तहसीलदार राजेंद्र लाड व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाथर्डी येथील भगवान श्री विश्वकर्मा मंदिरात विश्वकर्मा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने अभिषेक, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. योगेश चन्ने व त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजनाची धुरा सांभाळली.
नेवासा तालुकाध्यक्ष रवी मोरे (Ravi More) व उपाध्यक्ष संचेत प्रधान (Sanchet Pradhan) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात आली. वडूले (शेवगाव) येथे तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे व संतोष रणमले यांच्या उपस्थितीत उत्साहात पूजन संपन्न झाले.
समाज संघटन हीच खरी मानवंदना मानत कार्यक्रमा दरम्यान उपस्थित मान्यवरांनी भगवान विश्वकर्मा यांच्या कार्याचा गौरव करत समाज संघटित होणे हीच काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या सर्व कार्यक्रमांमुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
