अँड. उमेश अनपट - मराठी भाषा (Marathi Language) आणि साहित्याचा (Literature) विचार झाला की अनेकदा चर्चा महाराष्ट्राच्या सीमांमध्येच अडकून राहते. मात्र वास्तव वेगळे आहे. आज जगातील अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये मराठी लेखकांच्या साहित्यावर संशोधन होत आहे, पीएच.डी. (Phd) प्रबंध लिहिले जात आहेत आणि विविध अभ्यासक्रमांमध्ये त्यांचा समावेश केला जात आहे.
मराठी साहित्याला जगभरात सर्वप्रथम ओळख मिळवून दिली ती संत परंपरेने. १३ व्या शतकातील संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) यांनी रचलेली ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) आणि संत तुकाराम (Sant Tukaram) यांचे अभंग हे भारतीय भक्ती चळवळीचे आधारस्तंभ मानले जातात. धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि मानवतावाद यांचा संगम असलेले हे साहित्य जगभरातील संशोधकांना आकर्षित करत आले आहे.
आज अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये Religious Studies, Indian Philosophy आणि Bhakti Movement Studies या विषयांत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांचा अभ्यास केला जातो. मराठी भाषेचे पहिले जागतिक राजदूत म्हणून या दोन्ही संतकवींना मान द्यावा लागेल.
दलित साहित्य : मराठीची सर्वात प्रभावी जागतिक सांस्कृतिक क्रांती. मराठी साहित्याला आंतरराष्ट्रीय बौद्धिक विश्वात सर्वाधिक चर्चेचा विषय बनवणारा प्रवाह म्हणजे दलित साहित्य. मराठी आत्मकथनाचा चेहरामोहरा बदलणारे दया पवारांचे ‘बलुतं’ हे पुस्तक जगातील अनेक विद्यापीठांमध्ये Dalit Studies चा मूलभूत ग्रंथ मानले जाते.
बाबुराव बागुलांचे ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या पुस्तकाने भारतीय समाजव्यवस्थेतील जातीय वास्तवाचे निर्भीड चित्रण करणाऱ्या या कथांनी जागतिक साहित्यविश्वाचे लक्ष वेधले. शरणकुमार लिंबाळे यांची ‘अक्करमाशी’ हे आज जगभरातील दलित साहित्य अभ्यासक्रमांमध्ये सर्वाधिक शिकविल्या जाणाऱ्या भारतीय आत्मकथांपैकी एक आहे.
बेबी कांबळे यांचे ‘जिणं आमुचं’ हे दलित स्त्रीच्या अनुभवविश्वाला जागतिक व्यासपीठावर नेणारे साहित्य आहे. लक्ष्मण गायकवाड यांचे ‘उचल्या’ हा भटक्या-विमुक्त समाजाचे वास्तव प्रथमच जगासमोर मांडणारा दस्तऐवज आहे. नामदेव ढसाळ आणि नारायण सुर्वे हे कवितेतून समाजातील तळागाळातील संघर्षाला जागतिक अभिव्यक्ती देणारे कवी आहेत.
आज अमेरिकेतील, युरोपमधील आणि आशियातील अनेक विद्यापीठांमध्ये मराठी दलित साहित्य सामाजिक न्याय, जातव्यवस्था आणि मानवी हक्कांच्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग बनले आहे.
आधुनिक साहित्य आणि नाटक : मराठीच्या वैचारिक सामर्थ्याचा जागतिक चेहरा. संत साहित्याने मराठीचा आत्मा जगाला दाखवला आणि दलित साहित्याने तिचा संघर्ष; पण मराठीची वैचारिक आणि कलात्मक ताकद जगासमोर मांडली ती आधुनिक साहित्य आणि नाटकाने.
विजय तेंडुलकर हे जागतिक रंगभूमीवरील मराठीचा चेहरा ठरले. 'घाशीराम कोतवाल', 'सखाराम बाइंडर' आणि 'शांतता! कोर्ट चालू आहे', या नाटकांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. भारतीय समाजातील सत्ता, हिंसा, नैतिकता आणि सामाजिक विरोधाभास यांचे त्यांनी केलेले विश्लेषण आजही जागतिक विद्यापीठांमध्ये अभ्यासले जाते.
भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला' या कादंबरीने मराठी आधुनिक साहित्याला नवा चेहरा दिला. त्यांनी मांडलेला ‘देशीवाद’ हा साहित्य सिद्धांत आज तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासात महत्त्वाचा मानला जातो. भारतीय पुराणकथांचे आधुनिक पुनर्वाचन म्हणून वि. स. खांडेकर यांच्या 'ययाती'ला जागतिक मान्यता मिळाली.
मराठी कादंबरीचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व करणाऱ्या ग्रंथांमध्ये 'ययाती'चा अग्रक्रम आहे. शिवाजी सावंत आणि रणजित देसाई यांच्या 'मृत्युंजय' आणि 'श्रीमान योगी' या कादंबऱ्यांनी भारतीय इतिहास आणि पुराणकथांना जागतिक वाचकांपर्यंत पोहोचवले.
जगातील विद्यापीठांमध्ये सर्वाधिक चर्चिले जाणारे मराठी लेखक : संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे, वि. स. खांडेकर, दया पवार, बाबुराव बागुल, शरणकुमार लिंबाळे, नामदेव ढसाळ, बेबी कांबळे, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, नारायण सुर्वे, शिवाजी सावंत, रणजित देसाई, व्यंकटेश माडगूळकर, साने गुरुजी, किरण नगरकर, सचिन कुंडलकर, मिलिंद बोकील.
मराठी साहित्याचा जागतिक प्रवास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते. मराठीचा झेंडा जगभर नेण्याचे श्रेय कोणत्याही एका लेखकाला किंवा एका पुस्तकाला देता येणार नाही. संत साहित्याने मराठीला अध्यात्माचे अधिष्ठान दिले. दलित साहित्याने मराठीला संघर्षाची धार दिली.
आधुनिक साहित्य आणि नाटकाने मराठीला वैचारिक उंची दिली. हे तीन धुरंधर प्रवाह एकत्र आले आणि त्यांनी मराठी भाषेला जागतिक विद्यापीठांच्या वर्गखोल्यांपासून संशोधन केंद्रांपर्यंत पोहोचवले. म्हणूनच आज अभिमानाने म्हणता येते की, 'मराठी जगभर केवळ बोलली जात नाही; ती अभ्यासलीही जाते!'
