येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, सद्गुरु कृषी महाविद्यालय (मिरजगाव) येथे 'जागतिक रक्तदाता दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे आणि थॅलेसेमिया या गंभीर आजाराबाबत व्यापक जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकरराव नेवसे सर आणि संस्थेच्या अध्यक्षा कल्याणीताई नेवसे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण रक्तपेढी, अहिल्यानगरचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास मढीकर आणि जनकल्याण रक्त केंद्रातील 'थॅलेसेमिया मुक्त जिल्हा समन्वयक गौरव पठाडे उपस्थित होते.
डॉ. विलास मढीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रक्ताची गरज, नियमित रक्तदानाचे आरोग्याला होणारे फायदे आणि समाजातील रक्तदात्यांची महत्त्वाची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला.
गौरव पठाडे यांनी 'थॅलेसेमिया' या आनुवंशिक रक्तविकाराबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. या आजाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि विवाहपूर्व तपासणीचे महत्त्व सांगून त्यांनी 'थॅलेसेमिया मुक्त अहिल्यानगर' अभियानाची सविस्तर रूपरेषा मांडली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे त्यांनी निरसन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामदास बिटे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, रक्तदान हे सर्वोत्तम मानवसेवाकार्य आहे. आजच्या तरुण पिढीने सामाजिक बांधिलकी मानून नियमित रक्तदानासाठी पुढे येणे काळाची गरज आहे.
त्याचसोबत त्यांनी थॅलेसेमियासारख्या आजारांबद्दल समाजात अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरजही अधोरेखित केली. या विशेष कार्यक्रमाला महाविद्यालयातील १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.
याप्रसंगी प्रा. सचिन आढाव, प्रा. चांगदेव माने, प्रा. बाळासाहेब पारखे, प्रा. तेजस गायकवाड, प्रा. वैभव शिंदे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश कुतवळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. आढाव यांनी मानले.
