युट्युबवर चोरीची युक्ती पाहून उबर ड्रायव्हरला लुटणारी टोळी गजाआड


अहिल्यानगर (Crime News Update) - झटपट श्रीमंत (get rich quick) होण्याच्या हव्यासापोटी युट्युबवरील चोरीचे व्हिडिओ पाहून गुन्हेगारी करणार्‍या एका भयंकर टोळीचा अहिल्यानगरच्या एम.आय.डी.सी. पोलिसांनी (MIDC Police) पर्दाफाश केला आहे.


उबर ॲपद्वारे (Uber App) गाडी बुक करून चालकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन सराईत आरोपींना पोलिसांनी अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या (Arrested) असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील उबर कारचालक विशाल सूर्यकांत कट्टीमणी यांनी १३ जून २०२६ रोजी वाकडेवाडी एस.टी. स्टँडवरून माळेवाडीसाठी (ता. शेवगाव) ऑनलाईन बुकिंग (Online Booking) स्वीकारले होते. १४ जून रोजी पहाटे ३:४० च्या सुमारास खोसपुरी शिवारातील हॉटेल रिलॅक्सजवळ लघुशंकेचे बहाणा करून आरोपींनी गाडी थांबवायला लावली.

गाडी थांबताच चालकाच्या डोक्याला बंदूक (Weapon) लावून, हात बांधून आणि बेदम मारहाण करून त्याला गाडीबाहेर ढकलून दिले. आरोपींनी कार, सोन्याची अंगठी आणि रोख रकमेसह एकूण ५,७०,५०० रुपयांचा मुद्देमाल लुटला. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम अन्वये गुन्हा दाखल केला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.पोलिसांनी आनंदवाडी (ता. गेवराई) येथे सापळा रचला आणि पळून जाणाऱ्या तीन आरोपींना थरारक पाठलाग करून ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी :
  • विशाल सोमनाथ तांगडे (वय १९)
  • तुळशीराम उर्फ राम पंढरीनाथ चव्हाण (वय २१)
  • कल्याण उर्फ बबलू रामेश्वर गायकवाड (वय १९, सर्व रा. आनंदवाडी, जि. बीड)
आरोपींनी झटपट पैसे कमावण्यासाठी युट्युबवर (YouTube) गुन्हेगारीचे व्हिडिओ पाहिले होते. स्वतःची ओळख लपवून सिमकार्ड वापरणे आणि पोलिसांना सुगावा लागू नये म्हणून गाडीचे जी.पी.एस. यंत्रणा (GPS Tracking System) काढून फेकणे, अशा क्लृप्त्या त्यांनी युट्युबवरूनच शिकल्याची कबुली दिली.

पोलिसांनी चोरीची स्विफ्ट डिझायर कार आणि गुन्ह्यातील साहित्य जप्त केले आहे. ही कामगिरी उपनिरीक्षक मनोज मोंढे, सफौ. राकेश खेडकर, पोहेकॉ शैलेश रोहोकले, पोकॉ दीपक फुंदे, नवनाथ दहिफळे, किशोर जाधव, राहुल गुंड आणि अरुण सांगळे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास स.पो.नि. हेमंत थोरात करत आहेत. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !