अहिल्यानगर - विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेच्या वतीने, रविवारी २८ जून २०२६ रोजी शिर्डी (Shirdi) येथील 'शुभारंभ लॉन्स व मंगल कार्यालय' येथे विद्यार्थी गुणगौरव व समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात समाजातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त गणेश इंगळे (ACP Ganesh Ingale) उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य सचिव प्रा. विलास पवार हे होते.
यशाला शॉर्टकट नाही - विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे गणेश इंगळे म्हणाले की, "स्पर्धा परीक्षांमध्ये यशाला कोणताही शॉर्टकट (Shortcut) नसतो. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यांच्या बळावर कोणताही विद्यार्थी उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये अपार क्षमता आहे, गरज आहे ती फक्त योग्य ध्येय (Aim) निश्चित करून चिकाटीने प्रयत्न करण्याची." त्यांनी विद्यार्थ्यांना अपयशाला न घाबरता त्यातून शिकण्याचा सल्ला दिला.
संस्कार आणि शिक्षणाचे महत्त्व : कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. विलास पवार यांनी करिअरच्या दिशा स्पष्ट करताना सांगितले की, "विद्यार्थ्यांनी दहावी-बारावी नंतर सैन्यदल (एअरफोर्स Airforce, नेव्ही Navy, आर्मी Army) किंवा पोलीस (Police) दलात प्रवेशासाठी प्रयत्न करावेत.
ज्यामुळे कमी वयात व कमी खर्चात करिअरची सुरुवात होते. ज्यांची आर्थिक स्थिती सक्षम आहे, त्यांनी उच्च शिक्षणाकडे (JEE, NEET) वळावे."
राज्य कार्याध्यक्ष अरुण भालेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. तसेच, संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी 'विश्वकर्मा पुराण' आणि 'ज्ञानेश्वरी' यांसारख्या ग्रंथांचे वाचन करावे.
‘समाजरत्न’ पुरस्काराने सन्मानित मान्यवर : विविध क्षेत्रांत विशेष योगदान देणाऱ्या खालील मान्यवरांना 'समाजरत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
- महादेव बोरुडे (शैक्षणिक)
- पंढरीनाथ महाराज राजगुरू (आध्यात्मिक)
- सुनील लोंढे (उद्योजक)
- अशोकराव जाधव (कृषी)
- सुभेदार हरी गोरे (माजी सैनिक)
- युवराज दुधाले (कला)
- अर्जुन शिंदे (संशोधक)
- किस्किंदा पांचाळ (नारी शक्ती)
याव्यतिरिक्त पदवी, पदविका, दहावी, बारावी आणि विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रमुख उपस्थितांची उपस्थिती - या कार्यक्रमात संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण भालेकर, उपाध्यक्ष गोपाल राऊत, धनराज वेलणकर, राजेश नागापुरे, सहसचिव प्रमोद वेलकर, माजी मुख्याध्यापक तानाजी शेटे, महिला कार्याध्यक्षा शुभदा धामापूरकर, उपस्थित होते.
तसेच राज्य संघटक राजकुमार राऊत, प्रवक्ते भाऊसाहेब राऊत, संपर्क प्रमुख भगवान राऊत, संत गोरोबा काका पतसंस्था जामखेडचे अध्यक्ष विनायक राऊत, जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर आणि कार्याध्यक्ष आदिनाथ भालेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभू भगवान विश्वकर्मांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर यांनी प्रास्ताविक केले, तर सुभाष तमानके आणि आदिनाथ भालेकर यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व तालुका कार्यकारणीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. आदिनाथ भालेकर यांनी आभार प्रदर्शनासह कार्यक्रमाची सांगता केली.
