तिलांजली उतरंडीला : नव्या समतेच्या दिशेने एक पाऊल


पूर्वी खेड्यातील वाड्यांमध्ये आणि घराघरांत 'उतरंड' (Stack of earthen pots) असायची. खाली मोठा रांजण, त्यावर माठ, त्यावर गाडगे, त्यावर मडके आणि सर्वात वर छोटेसे बोळके... धान्य, चटणी, मीठ इत्यादी वस्तू ठेवण्यासाठी या उतरंडीचा वापर केला जायचा.


वर असणारे ते बोळके अगदी इवलेसे असायचे, पण त्यात मीठ असायचे—जणू संपूर्ण उतरंडीचे ते प्रतिनिधित्वच करायचे. या बोळक्याला कोणी काही म्हणत नसे; परंतु सर्वात उंचावर असल्यामुळे त्याला स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा भास (Illusion of superiority) व्हायचा आणि तिथूनच सर्व घोळ सुरू व्हायचा!

आज मला तुम्हाला अशाच एका सामाजिक उतरंडीबद्दल (Social Hierarchy) सांगायचे आहे. समाजात स्त्रीला आजही दुय्यम स्थान (Secondary status) दिले जाते. स्त्री-पुरुष समानतेच्या (Gender equality) गप्पा केवळ कागदावरच राहिलेल्या दिसतात.


तिच्या नशिबी असलेली ही दुय्यमतेची उतरंड काही प्रमाणात नक्कीच कमी झाली आहे; परंतु सर्वच शिकलेले लोक खरोखर सुशिक्षित आणि प्रगल्भ असतातच असे नाही. तुम्ही कदाचित तसे नसाल, पण समाजात वावरताना असे अनेक कटू अनुभव येत राहतात.

ही सामाजिक उतरंड थोडी वेगळी आहे. तळागाळातील महिलांसाठी काम करत असताना, तथाकथित सुशिक्षित लोकांचेही अनुभव काही वेगळे नव्हते. या सामाजिक प्रवासात आलेल्या अनुभवांवरूनच मी हे सांगत आहे.

समाजाने ठरवलेली स्त्रीची ही उतरंड कशी आहे, पाहा:
  • पहिला क्रमांक: दोन मुले असलेली स्त्री
  • दुसरा क्रमांक: एक मुलगा असलेली स्त्री
  • तिसरा क्रमांक: एक मुलगा आणि एक मुलगी असलेली स्त्री
  • चौथा क्रमांक: दोन मुली आणि एक मुलगा असलेली आई
  • पाचवा क्रमांक: दोन मुलींची आई... (हिला आजही अनेक खेड्यांमध्ये डोहाळजेवणाची ओटी भरण्याची परवानगी दिली जात नाही, हे कटू सत्य आहे आणि माझा स्वतःचा अनुभवही आहे.)
  • सहावा क्रमांक: मूल नसलेली स्त्री... (हिला डोहाळजेवण, बारसे अशा कौटुंबिक समारंभांत मुद्दाम मागे ठेवले जाते.)
  • सातवा क्रमांक: अविवाहित / लग्न न झालेली स्त्री
  • आठवा क्रमांक: परित्यक्ता म्हणजे नवऱ्याने सोडलेली स्त्री
  • नववा क्रमांक: पतीचे निधन झालेली स्त्री, जिला समाजाने 'विधवा' (Widow) हे नाव दिले आहे.
माझा मुळात 'विधवा' या शब्दालाच तीव्र आक्षेप आहे. नवरा सोबत असेल तर ती 'सौभाग्यवती' (आणि नवरा अयोग्य वागत असेल, तरीही ती कशी काय 'सुभाग्याची'?), आणि नवरा नसेल तर ती 'विधवा'... हे कसले नियम आहेत?
असे उच्च-नीचतेचे सामाजिक स्तर (Social strata) कोणी ठरवले? तिचे कपडे, तिचे वागणे यावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नसताना, लोक बिनदिक्कतपणे तिला टीकेचे लक्ष्य (Target of criticism) करतात!

जगा आणि तिलाही माणूस म्हणून जगू द्या—हे साधे, सोपे आणि सरळ तत्वज्ञान लोकांच्या लक्षात का येत नसावे? आपण आपली दृष्टी आणि नजर बदलली, की आपले विचारही नक्कीच बदलतील.

अर्थात, आता ही जुनाट मानसिकता हळूहळू मागे पडत चालली आहे; पण या कुप्रथेपोटी अनेक पिढ्यांनी किती प्रचंड वेदना सोसल्या आहेत! सुदैवाने, आजची नवी पिढी सहनशीलतेच्या राखेत झिजणारी राहिलेली नाही.

आता स्त्री सक्षमीकरणाची (Women Empowerment) ही प्रक्रिया सर्व अर्थांनी सक्षम होण्याच्या मार्गावर पुढे जात राहायला हवी. आपल्यावर लादलेल्या बुरसटलेल्या रुढी, परंपरा आणि सामाजिक अडथळे पार करून, स्वतःमधील 'माणूसपणाच्या' अंतरात्म्याला स्पर्श करण्याची ताकद आपल्याला मिळो!

आज या वर्षाच्या सरत्या दिवशी मला मनापासून आशा वाटते की, आपल्या सर्वांच्या मनात भगिनीभाव (Sisterhood) सदैव जागृत राहो. स्त्रीवरील अत्याचार आणि बलात्कारासारख्या भयंकर घटना पूर्णपणे थांबल्या पाहिजेत. प्रत्येक स्त्रीला तिचे मोकळे आकाश आणि स्वप्नांना नवीन पंख मिळावेत...

तिच्या भावनांना योग्य शब्द लाभावेत! या जन्मात तिने पुन्हा नव्याने जन्माला यावे... पुन्हा एकदा बहरावे, फुलावे आणि स्वतःच्याच सुगंधात न्हाऊन निघावे! वो सुबह अब तो जरूर आयेगी.!

चला मग, माझ्यासोबत... एका नव्या समतेच्या आणि प्रेमाच्या जगात! त्या जुनाट उतरंडीला कायमची तिलांजली देऊन.. येताय ना?

– स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !