येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - १५ व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये बसवण्यात आलेले सोलर हायमास्ट दिवे (Solar Highmast Lights) अवघ्या काही महिन्यांत बंद पडल्याने गावांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने (VBA) केला आहे..
या प्रकरणी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या दोषी कंत्राटदारांवर कारवाई करावी आणि बंद दिवे तात्काळ सुरू करावेत, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (ZP CEO) निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
हे निवेदन जिल्हाध्यक्ष योगेश साठे (Yogesh Sathe) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. कंत्राटदारांनी अत्यंत निकृष्ट दर्जाच्या बॅटरी आणि सोलर पॅनेल्स (Solar Panels) वापरल्यामुळे हे दिवे निकामी झाले आहेत.
५ वर्षांचा देखभाल करार असतानाही बिले मंजूर होताच कंत्राटदार जबाबदारीतून पळ काढत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी अपघात, चोऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
- सर्व सोलर दिव्यांचे तांत्रिक ऑडिट (Technical Audit) करण्यात यावे.
- दोषी कंत्राटदारांची बँक गॅरंटी जप्त करून त्यांना काळ्या यादीत (Blacklist) टाकावे.
- प्रत्येक पोलवर तक्रार निवारण क्रमांक (Helpline Number) लिहिणे सक्तीचे करावे.
येत्या १५ दिवसांत प्रशासनाने बंद दिवे दुरुस्त करून दोषींवर कारवाई न केल्यास जिल्हा परिषदेसमोर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

