अहिल्यानगर - झेंडूच्या पिकाच्या आड छुप्या पद्धतीने केली जाणारी गांजाची (Cannabis / Marijuana) शेती स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch - LCB) उघडकीस आणली आहे. इमामपूर (ता. अहिल्यानगर) येथील एका शेतावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल २२ लाख २० हजार ७५० रुपये किमतीचा ४४.४१५ किलोग्रॅम गांजा जप्त केला.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर धंद्यांवर (Illegal Activities) कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गस्त घालत होते.
दि. १० ऑक्टोबर २०२६ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त सुरू असताना, इमामपूर येथील देविदास रंगनाथ टिमकरे (वय ६४) याने आपल्या झेंडूच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती (Confidential Information) पोलिसांना मिळाली.
माहितीची खात्री पटल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) हेमंत थोरात, एलसीबीचे पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचांसह इमामपूर येथील शेताची पाहणी केली.
झेंडूच्या पिकाच्या आडोशाने लावली गेलेली गांजाची लहान-मोठी झाडे पाहून पोलीसही अवाक झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ६४ वर्षीय आरोपी देविदास टिमकरे याला ताब्यात घेतले. त्याच्या शेतातून २२ लाख २० हजार ७५० रुपये किमतीची ४४.४१५ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी आरोपी देविदास टिमकरे याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात 'एनडीपीएस' कायद्यानुसार (NDPS Act 1985) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचनेनुसार एलसीबी व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने केली.
पोलिसांच्या या कारवाईमुळे अमली पदार्थांची बेकायदेशीर शेती करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

