येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - पारंपरिक भारतीय वाद्ये व पाश्चात्य वाद्ये (Western Instruments) यांचा सुंदर मिलाफ, भक्तिसंगीताचा आध्यात्मिक गंध आणि आधुनिक संगीताचा (Modern Music) दमदार ठेका यांचा अनोखा संगम अनुभवण्याची पर्वणी अहिल्यानगरकरांना नुकतीच मिळाली.
निमित्त होते 'अनाहत एक कलासृष्टी' आयोजित आणि 'महावीर ग्रुप'च्या (Mahavir Group) विशेष सहकार्यातून पार पडलेल्या ‘द भक्ती बीट्स’ (The Bhakti Beats) - भजन जॅमिंग अँड फ्युजन (Bhajan Jamming & Fusion) या सांगीतिक सोहळ्याचे! माऊली सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड 'हाऊसफुल्ल' (Houseful) प्रतिसाद लाभला.
'देव | देश | धर्म' संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाची सुरुवात 'आई गिरी नंदिनी' या देवीच्या भक्तिगीताने झाली. यानंतर 'हनुमान चालीसा', 'मंगल भवन अमंगल हारी' (जय श्रीरामचा जयघोष), 'राम नाम जप', 'वो कान्हा तेरी बासुरी', 'ब्रज रस', 'अरे द्वारपालो', 'रामा रामा रटते रटते' आणि 'अवध में राम आए हैं' यांसारख्या गीतांनी रामभक्तीचा उत्कट आविष्कार घडवला.
तसेच 'ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने' आणि 'नमो नमो जी शंकरा' या (Bhakti Beats) गीतांमधून भगवान शंकराला संगीतमय वंदन करण्यात आले. तरुण कलाकारांच्या दर्जेदार (Fusion) सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
समर्थभक्त मंदारबुवा रामदासी, आमदार संग्राम जगताप, उपमहापौर धनंजय जाधव, विजयाताई भंडारी, गणेश निकम, सुधीर चोपडा, पुष्पाताई बोरुडे, राजाभाऊ मुळे, अनिल मोहिते, अविनाश शिरापुरी, प्रसाद सुवर्णपाठकी, प्रसाद बेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी बोलताना समर्थभक्त मंदारबुवा रामदासी म्हणाले, "अनाहत एक कलासृष्टीने भक्तीचे विचार रुजविण्यासाठी हा अभिनव कार्यक्रम आयोजित केला आहे. मानवाकडून देवत्वाकडे जाण्याचा प्रवास या भक्तिसोहळ्यातून अनुभवता येतो."
उमेशराज साळुंके, गणेश बैरागी, सौरभ साठे, गौरी रत्नपारखी आदी प्रतिभावंत गायक व वादकांनी आपल्या कलागुणांनी गाण्यांना नवी उंची दिली. पारंपरिक भजनांना आधुनिक संगीतशैलीची जोड देत नव्या पिढीला भारतीय संस्कृतीशी जोडण्याचा हा अनोखा प्रयत्न यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
