पीडीत २७ वर्षीय तरुणी औरंगाबाद शहरात एकटीच राहत होती. कडू महिनाभरापूर्वी औरंगाबादला गेला असता ही तरुणी त्याला दिसली. तो तिला कारमधून पुणे येथे घेऊन गेला. एक महिना तिला सोबत ठेवून त्याने तिच्यावर अत्याचार केला. सोमवारी रात्री कडू तरुणीला घेऊन औरंगाबादकडे निघाला होता. पहाटे कार नगर-पुणे रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आली. यावेळी अभयने कार रस्त्याच्या बाजूला घेऊन तरुणीवर अत्याचार केला. या प्रसंगाने घाबरून गेलेली ही तरुणी विवस्त्र अवस्थेत कारमधून बाहेर पळाली.
सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना ही पीडित तरूणी शहरातील चांदणी चौक परिसरात विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरून पळताना आढळली. याबाबत माउली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर डॉ. धामणे यांनी पोलिसांच्या मदतीने या तरुणीस शिंगवे नाईक येथील माउली प्रतिष्ठानमध्ये नेले. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
मंगळवारी सकाळी तिची प्रकृती सुधारल्यानंतर घडलेली घटना तिने डॉक्टर सुचेता धामणे यांना सांगितली. तिची मानसिक स्थिती सामान्य नसल्याने डॉ़ धामणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.