रेखा जरे हत्याकांड : तीन आठवडे उलटले
मुख्य सूत्रधार बोठे फरारीच
तपास यंत्रणांचा वेग मंदावला
अहमदनगर : महाराष्ट्र पोलिस दलात अफलातून, उतुंग कामगिरीमुळे अहमदनगर पोलिसांचा रुतबा नेहमीच वरच्या स्थानी राहिलेला आपणास पहावयास मिळतो. अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करून कुख्यात सराईत गुन्हेगारांना गजाआड करून गुन्हेगारांवर कायद्याचा धाक कायम ठेवणाऱ्या अहमदनगर पोलिसांना रेखा जरे हत्याकांडातील मास्टरमाइंड आरोपी बाळ बोठे सापडत नसल्याने त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ पहात आहे. आपली उतुंग प्रतिमा राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून आरोपी बोठेस जेरबंद करण्याचे मोठे आव्हान नगर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या प्रकरणात पाच आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार बाळ बोठे पसार आहे. बोठे याच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. जरे यांची हत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हे बोठेच्या चौकशीतूनच समोर येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पोलीस आरोपी बोठे याचा कसून शोध घेत आहेत.
दरम्यान, रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर अवघ्या काही तासात पाच आरोपींना एलसीबीसह विशेष तपास पथकांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. राहाता, श्रीरामपूर ते थेट कोल्हापूर सारख्या शेकडो किलोमीटरवर पळून गेलेल्या या पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले.
मात्र, नगर शहरातच असलेला आरोपी बाळ बोठे याने मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याने संभ्रमावस्ता निर्माण झाली आहे. बाळ बोठे ला पकडन्याच्या वेळीच नगर पोलिसांची उत्कृष्ट तपास यंत्रणा, त्यांचे खबऱ्याचे नेटवर्क कसे काय गहाळ राहिले हे समजायला मार्ग नाही.
आपले नाव गुन्ह्यात आले याची खबर बोठेला नेमकी कोणी दिली असेल, ज्यामुळे पोलीस पोहचण्याआधीच तो लगबगीने पळून गेला. हा 'खबरी' कोण, ज्याने पोलिसांच्या मेहनतीवर पाणी फेरले. याचा शोध घेतल्यास निश्चितपणे पोलिसांना फरार बोठेच्या पाऊलखुणा सापडतील.
परिणामी त्याला जेरबंद करण्यात यश मिळेल. बोठेचे नाव गुन्ह्यात मास्टरमाईड म्हणून पुढे येईपर्यंत पोलीस तपास अगदी योग्य दिशेने, वेगात सुरू होता. मात्र, यानंतर हा तपास काहीसा मंदावल्याचे दिसते.
३ डिसेंबर ला रेखा जरे हत्या प्रकरणात आरोपी पत्रकार बाळ बोठे याचे नाव उघड झाल्यानंतर बोठे पसार झाला आणि पोलिसांकडून शोधाशोध सुरू झाली. दरम्यान, ७ डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी बाळ बोठेचा जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल झाला.
या अर्जावर ८ डिसेंबर ला न्यायालयात सुनावणी देखील झाली. त्यावेळी सरकारी पक्षाला नोटीस काढत म्हणणे मांडण्यास सांगितले. त्यानुसार ११ डिसेंबर सरकारी पक्षाने म्हणणे मांडताना आरोपी बाळ बोठे याने अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी वेळी न्यायालयात हजर राहण्याबाबत सरकारी पक्षाने दिला अर्ज दिला होता. त्यास न्यायालयाने फेटाळून लावले. तसेच 16 डिसेंबर रोजी आरोपी बाळ बोठेचा जमीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला.
30 नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची हत्या झाल्यापासून आजतागायत तब्बल तीन आठवडे लोटले तरी देखील पोलिसांना 'मास्टरमाईंड बाळ' सापडेना. वेगाने तपासाची चक्रे फिरविणाऱ्या, गुन्हेगारांच्या मनात धडकी भरविणाऱ्या नगर पोलिसांना 'बाळ' नावाचा आरोपी सापडेना, हे काही केल्या उमगायला तयार नाही.
हतबल पोलिसांना अडथळा कुठला?
परराज्यात पळून गेलेल्या कुख्यात गुन्हेगाराच्याही मुसक्या बांधण्याची ताकद नगर पोलिसांमध्ये आहे. नेहमीच उत्कृष्ट कामगिरीचा चढता आलेख ठेवणारे नगर पोलिस नेमके या गुन्ह्याच्या तपासतच हतबल का, हे समजायला मार्ग नाही. बोठे पलायनाचा माघ काढताना त्यांना कुठलाही 'क्लु' का मिळत नाही. तपास प्रक्रियेत नेमका कुठला गहण अडथळा येतोय हे समजायला तयार नाही.
राष्ट्रवादी, महिला संघटना गप्प का?
रस्त्यावर निर्दयीपणे गळा चिरून हत्या करण्यात आलेल्या रेखा जरे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा होत्या. महिलांवरील अन्यायाच्या घटनेवर आंदोलनांच्या माध्यमातून त्या रणरागिणी प्रमाणे स्वतः आवाज उठवत असत. याबरोबरच महिला अन्यायावर आवाज उठविणाऱ्या विविध सामाजिक संघटना अहमदनगर जिल्ह्यात आहेत.
जिल्ह्यात कुठेही महिलांवर अन्याय झाल्यास या महिला संघटना पोलिस, प्रशासनास अक्षरशः धारेवर धरतात. मात्र, महिला अत्याचारा साठी लढणाऱ्या रणरागिणीचा आवाज निर्घृण हत्या करून बंद केला असताना देखील राष्ट्रवादीसह, महिला संघटना गप्प का, असाही प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
तो 'गॉडफादर' कोण?
मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठेला घरातून पळून जाण्यास मदत करण्यापासून तीन आठवडे उलटूनही पोलिसांपासून दडून ठेवन्यात यशस्वी झालेला बोठेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला वजनदार 'गॉडफादर' कोण, असा प्रश्न या निमित्ताने जनतेमधून उपस्थित होतोय.
बोठेच्या शोध मोहिमेत तपास यंत्रणेची चांगलीच दमछाक करणाऱ्या या तस्सम 'गॉडफादर'नेही निर्भीड पोलिसांना चांगलेच सतावून सोडलंय, असेच चित्र सध्या पहावयास मिळत आहे.