कोकणातील पर्यटनाला मिळणार व्यापक चालना

मुंबई - कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. कोकणात पंचतारांकित हॉटेल्स गुंतवणूक करित आहेत. यापुढील काळातही कोकणाच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रांच्या अनुषंगाने व्यापक कार्य केले जाईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक धनंजय सावळकर उपस्थित होते. 

पर्यटनमंत्री ठाकरे म्हणाले, कोकणात बीच शॅक टुरीजम, टेंट टुरीजम, कॅराव्हॅन टुरीजम यासह कृषी पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव आहे. होम स्टेच्या माध्यमातून येथे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या विविध पर्यटन ठिकाणांच्या विकासाचा आराखडा करुन त्याला चालना देण्यात येईल. 

यासंदर्भात वेळोवेळी आढावा बैठक घेऊन कोकणाचा पर्यटन विकास व त्या माध्यमातून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देऊ, असेही ठाकरे यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, कोकणातील साने गुरुजी यांचे स्मारक, कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक आदी कामांना मंजुरी देऊन त्यास गती देण्यात यावी. 

तसेच कोकणासह राज्यातील किल्ल्यांच्या विकासाला चालना देण्यात यावी. दुबईच्या धर्तीवर कोकणामध्ये ग्लोबल व्ह‍िलेजसारखा पर्यटन उपक्रम राबविता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !