भाजप-राष्ट्रवादीत जामखेड मध्ये मनोमिलन
अहमदनगर : आम्ही विखे गटाचे कार्यकर्ते आहोत आणि या पुढेही राहू. मात्र शेतकऱयांच्या हितासाठी आणि जामखेडच्या विकासकामांसाठी आमदार रोहित पवार यांच्या सोबत आहोत, अशी माहिती जामखेड बाजार समितीचे संचालक सुधीर राळेभात यांनी पत्रकार परिषदेत दिली. या घडामोडीमुळे मुळे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात स्थानिक पातळीवर मनोमिलन झाल्याचे दिसून येत आहे. तर माजी मंत्री राम शिंदे यांना पुन्हा बॅकफूटवर जाण्याची वेळ आली आहे.
पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, संचालक जगगनाथ राळेभात, आदी पदाधिकाऱयांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भोसले म्हणाले, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या सूचनेनुसारच मी अर्ज माघारी घेतला आहे. आमदार रोहित पवार, जगन्नाथ राळेभात, सुधीर राळेभात आदींच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
सुधीर राळेभात म्हणाले, जगगनाथ राळेभात व त्यांचा मुलगा अमोल राळेभात या दोघांचे अर्ज आता शिल्लक राहिले असून डॉ. सुजय विखे यांच्याशी चरचा करून अमोल राळेभात यांचा अर्ज मागे घेण्यात येईल. त्यामुळे पाचव्यांदा संचालक होण्याचा मान जगन्नाथ राळेभात यांना मिळणार आहे. जामखेड तालुक्यात पवारांच्या नेतृतवाखाली विकासकामे सुरु असल्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला आहे.
जिल्हा बँकेसाठी विकास सेवा संस्था मतदार संघातून संचालक जगगनात राळेभात यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज सोमवारी मागे घेतला.
राम शिंदे बॅकफूटवर
जिल्हा बँकेसाठी जगन्नाथ राळेभात अर्ज भरत असताना माजी मंत्री राम शिंदे हे बरोबर होते. मात्र यानंतर आमदार रोहित पवार यांनी जमेचे राजकारण करत स्थानिक पातळीवर विखे गटाला जवळ करत राष्ट्रवादीचे भोसले यांचा यांचा अर्ज माघारी घेण्याचा डाव खेळला. त्यांच्या या खेळीमुळे राम शिंदे यांना मात्र पुन्हा एकदा पवारांसमोर बॅकफूटवर जावे लागले आहे.