नागपूर : शेतकऱयांपाठोपाठ आता जीएसटी विरोधात व्यापाऱयांनी बंदची हाक दिली आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) या कायद्या विरोधात 26 फेब्रुवारी रोजी देशभरात चक्काजाम करण्याची घोषणा केली आहे. आंदोलनास ट्रान्स्पोर्ट सेक्टरची सर्वात मोठी संघटना असलेल्या ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट वेल्फेअर असोसिएननेही पाठिंबा दिला आहे. या दिवशी सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आजपासून नागपूरमध्ये येथे सुरु झालेल्या सीएआयटीच्या (कॅट) तीन दिवसाच्या राष्ट्रीय व्यापार संमेलनात देशातील सर्व राज्यातील 200 हून अधिक व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आले आहेत. कॅटच्या अंतर्गत येणारे देशातील 8 कोटी व्यापारी आंदोलनाला पाठिंबा देतील. तसेच ऑल इंडिया टान्स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशनही या आंदोलनात सहभागी होणार आहे.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल तसेच ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप सिंघल यांनी संयुक्तरित्या सोसावारी भारत बंदची घोषणा केली आहे.
जीएसटी कौन्सिलने जीएसटीचे स्वरुप आपल्या फायद्यासाठी विकृत केल्याचा आरोप भारतीय आणि खंडेलवाल यांनी केला आहे. तसेच जीएसटी प्रणाली पूर्णपणे फोल ठरल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज्यांना आपल्या स्वार्थांची चिंता अधिक आहे. त्यांना जीएसटी प्रणालीच्या सुसूत्रीकरणाशी काहीही घेणंदेणं उरलेलं नाही.
देशातील व्यापारी व्यापार करण्यापेक्षा दिवसभर जीएसटी नियमांचे पालन करण्याच्या कामात व्यग्र असतात. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे जीएसटीचा आगामी काळात पुनर्विचार केने गरजेचं आहे.
जीएसटीमध्ये गेल्या चार वर्षात 937 वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.त्यामुळे जीएसटीचा मूळ गाभाच बदलून गेला आहे. अनेकदा कॅटने जीएसटीबाबत अनेक सूचना केल्या. पण त्याकडे लक्ष दिलेले नाही. जीएसटी परिषद लक्षच देत नाही. त्यामुळेच आपले म्हणणे देशातील जनतेसमोर मांडावे या करिता आम्ही भारत बंदची हाक दिली असून त्या दिवशी संपूर्ण उद्योग-धंदे बंद राहतील, अशी घोषणा कॅटने केली आहे.