नाशिक - आपल्या स्पष्ट आणि फटकळ शैलीमुळे अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी त्यांनी लस घेण्याऐवजी वेगळाच उपाय सुचवला आहे.
नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील एका कार्यक्रमात प्रबोधन करताना ते बोलत होते. यावेळी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत आपला अनुभव सांगत त्यांनी जाहीरपणे भाष्य केले.
इंदोरीकर महाराज म्हणाले, "मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही, कोरोनाला एकच औषध, ते म्हणजे मन खंबीर ठेवा". महाराजांचे हे वक्तव्य वादात सापडण्याची शक्यता आहे.
किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे त्यांच्या किर्तनातील परखडपणे बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी राज्यात सर्वत्र नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दीही करतात.
आता त्यांनी कोरोना लसीबद्दल हे विधान केले आहे. संपूर्ण देशात लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यात त्यांनी याविरुद्ध वक्तव्य केले आहे. मी लस घेतली नाही आणि घेणारही असे ते म्हणाले.
नाशिक जिल्ह्यातील घोटी येथे गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त घोटी कृषी उत्पन बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांचे किर्तन आयोजित केले होते. त्यावेळी इंदोरीकर महाराज बोलत होते.
काही होतच नाही तर लस घेऊन करणार काय.? कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा", असा सल्लाही त्यांनी यावेळी प्रबोधन करताना दिला.
या किर्तनाला ५०० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. ते म्हणाले की, 'प्रत्येक माणसाची प्रतिकार शक्ती वेगवेगळी असते. प्रत्येकाची मेंदूची क्षमताही वेगवेगळी आहे. मी लस घेतलेली नाहीये आणि घेणारही नाही.
लसीकरणाविषयी जागृती करण्याऐवजी अप्रत्यक्षपणे ते लस घेऊ नका, असे सांगितल्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.