इंदिरानगर पोलीस ठाण्याने पत्रक काढून दिली माहिती
नाशिक - पाथर्डीफाटा येथील एका नामांकित हॉटेलात २ फेब्रुवारी रोजी डांबून ठेवलेल्या हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याची सुटका पोलिसांनी केली होती. या विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर आता संबधीतांवर पुन्हा पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याने पत्रक काढून दिली आहे.
इंदिरानगर पोलिसांनी गुरुवारी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, की उत्तर प्रदेशातील बरेलीच्या नारायण इन्स्टिट्यूट चे १४ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हॉटेल मध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाले होते. २ फेब्रुवारीला या विद्यार्थ्याना मारहाण करून डांबून ठेवल्याची माहिती फोनद्वारे इंदिरानगर पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार हॉटेलात जाऊन पोलिसांनी या प्रकाराची चौकशी केल्यानंतर आम्हाला विद्या वेतन मिळत नाही आणि आमच्या कडून जास्त तास काम करून घेतले जाते असे विद्यार्थ्यानी पोलिसांना सांगितले. ही बाब कामगार उप आयुक्तांच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांना याबाबत विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान १४ प्रशिक्षणार्थींपैकी ११ जण त्यांच्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा देण्यासाठी गेले असून ३ जण अद्याप हॉटेल मध्येच प्रशिक्षण घेत आहेत.
'त्या' व्हायरल व्हिडिओ मागील गुपित काय ?
आम्हाला मारहाण झाली नसल्याचे विद्यार्थ्यानी सांगितल्याचे इंदिरानगर पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. मात्र, हॉटेल मॅनेजमेंटने डांबून ठेऊन मारहाण केल्याच्या तक्रारी करणारे व्हिडीओ , ऑडिओ क्लिप सोशल मीडियातून व्हायरल झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
पोलीस म्हणतात तसे विद्यार्थ्याना मारहाण झाली नसेल तर मग व्हायरल होणारे हे व्हिडीओ कोणाचे आहेत यामागील सत्य पोलिसांनी शोधून काढून 'दूध का दूध अन पाणी का पाणी' नेमकं काय ते उजेडात आणायाला हवे.