बरेली (सिरौली) – उत्तर प्रदेश राज्यातील बरेली जिल्ह्यातील सिरौली परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ ४० दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या एका युवकाने गावकऱ्यांच्या सततच्या चिडवण्याला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या युवकाच्या पत्नीचे सौंदर्य गावात चर्चेचा विषय झाले असून, "तू तर वेडा आहेस, तुझी बायको खूपच सुंदर आहे" अशा शब्दांत काही तरुण त्याची सतत खिल्ली उडवत होते. या सततच्या मानसिक त्रासामुळे संबंधित युवक तणावाखाली आला आणि त्याने गावातील दोन मजली इमारतीच्या टेरेसवर चढून खाली उडी मारण्याची धमकी दिली.
हा प्रकार पाहून गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी युवकाशी संवाद साधून त्याला शांतपणे समजावलं. पोलिसांच्या समजूतदारपणामुळे युवकाला सुरक्षित खाली उतरवण्यात यश आलं.
त्याच्यावर पुढील मानसिक उपचार करण्यासाठी त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आलं आहे. हा प्रकार समाजातील मानसिक आरोग्य आणि विनाकारण दिल्या जाणाऱ्या टोमण्यांचे गंभीर परिणाम किती भयावह ठरू शकतात, याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
पोलिसांनी युवकाला त्रास देणाऱ्या तरुणांविरुद्ध चौकशी सुरू केली असून, योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले आहे. दरम्यान, याबाबत युवकाला त्रास देणाऱ्यांना समज देण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.