‘लेक चालली सासरला’ हा चित्रपट जरी पूर्वीचा असला, तरी त्यात दाखवलेला सुनेचा छळ आजही काही घरांमध्ये वास्तव आहे. पूर्वी शिक्षणाचा अभाव होता, निर्णय घेणारा फक्त पुरुष असायचा आणि मुलगी ही केवळ जबाबदारी समजली जायची.
अशा काळात मुलींची लग्न लहान वयात लावली जात आणि शिक्षण फक्त सातवीपर्यंतच मर्यादित असे. पण आज शिक्षण, करिअर, स्वावलंबन यामुळे स्त्री खंबीर झाली आहे.
असं असतानाही अलीकडे घडलेली वैष्णवी हरवणे हुंडाबळी घटना धक्कादायक आहे. ही मुलगी उच्चशिक्षित होती, प्रेमविवाह केला होता, म्हणजे तिची आणि तिच्या जोडीदाराची आधीपासून ओळख होती.
मग तिच्या वागणुकीत लपलेला खरा चेहरा ओळखता आला नाही का.? आणि सासरच्या मंडळींचा लोभीपणा घरच्यांनी का ओळखला नाही.? या प्रकरणात वैष्णवीच्या वडिलांचीही एक चूक दिसून येते.
सासरच्यांनी गाडी, पैसा, चांदी यांसारख्या गोष्टी मागितल्या आणि त्या दिल्या गेल्या. हुंडा थेट मागितला नाही, पण ‘काय द्यायचं ते तुम्ही ठरवा’ अशा शब्दांत मागणी केली गेली, हे काय वेगळं.? समाजाची भीती, घराण्याची प्रतिष्ठा, लग्न मोडू नये ही काळजी यातूनच अनेक आईवडील आपल्या मुलीचा स्वाभिमान हरवतात.
आजची मुलगी सक्षम आहे, कर्तबगार आहे. ती सासरवर नव्हे, तर स्वतःच्या हिमतीवर उभी आहे. पण काही घरांमध्ये अजूनही "मुलगी म्हणजेच चुल आणि मूल" असा दृष्टिकोन आहे.
घरात पुरुषच निर्णय घेतात, महिलांनी फक्त घर सांभाळायचं अशी अपेक्षा असते. वरवर उच्चभ्रू वाटणाऱ्या घरांमधील महिलांनाही चार भिंतींच्या आत गुदमरावं लागतं. मुलींनो, शिकून घ्या, स्वावलंबी बना. कुणावरही आर्थिक किंवा मानसिक अवलंबित्व नको.
प्रेमविवाह करायचा असेल तर समोरच्याला ओळखा, त्याच्या वागणुकीमागचं सत्य समजून घ्या. तुमच्या शरीरावर किंवा पैशावर प्रेम करणाऱ्यांना वेळेत ओळखा आणि दूर ठेवा. आईवडीलांनीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे – मुलीचं आयुष्य सुरक्षित आणि सुखी ठेवणं हे केवळ वस्तू देऊन शक्य होत नाही.
वैष्णवीच्या वडिलांनी तिच्या नवऱ्याच्या पहिलेच लक्षणं ओळखून, त्याच्या मागण्यांना नकार दिला असता, तर आज वैष्णवी समाजात ताठ मानेने, स्वतःच्या उद्योगात यशस्वी मालकीण म्हणून जगली असती.
जीवनात संकटं येतातच, पण आत्महत्येचा मार्ग यावर उपाय नाही. थोडं थांबा, विचार करा, वेळेला जाऊ द्या – जीवन नक्कीच पुढे जातं. आज समाज बदलतोय, पण मानसिकता बदलायला अजून वेळ लागेल. पण हा बदल आपणच घडवायचा आहे – शिक्षण, जागृती आणि आत्मभान यातून.!
- आशा सुधीर साठे, अहिल्यानगर