दि. १५ मे १९९४ ला युनायटेड नेशनमध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला. 'लिंडा ग्रोवर' या सामाजिक काम करणाऱ्या महिलेने 'सिटिजन्स ऑफ ग्लोबल सोल्युशन ' या चळवळीव्दारे सलग १० वर्ष चळवळीचा प्रसार केला.
या चळवळीचे उद्दीष्टच मुळी 'एकत्र या, संवाद साधा, प्रोत्साहन द्या, संपर्क साधा', असे आहे. ग्लोबल फॅमिली ही न्युयॉर्कमधील स्वयंसेवी संस्था संयुक्त राष्ट्राच्या या उपक्रमास हातभार लावत असते.
पाश्चात्त्य देशातील कुटुंबपध्दतीचे अनिष्ट परिणाम हे त्यांच्या लक्षात आल्याने पाश्चात्त्यांना असे दिवस साजरे करण्याची आवश्यकता भासते. भारतात एकत्र कुटुंबपध्दती पुरातन काळापासून अस्तित्वात आहेच. नातीही अनेक असतात. आणि आपुलकीचा, सौहार्दाचा ओलावा तितकाच चिंब करणारा असतो.
या लॉकडाऊन काळात तर साऱ्या जगाने 'वसुधैव कुटुंबकम' अनुभवलही. कुटुंब म्हणजे काय असतं, संवादांचे पूल बांधणं, नात्यातले दुरावे कमी करत रहाणं, एकमेकांचा सन्मान करणं, मुद्दाम मनात चांगल्या आठवणींची साठवण करणं, नातेसबंध दृढ करणं..
सगळ्यात महत्त्वाचे नाते कुठलेही असू द्या त्याला वेळ देणं फार जरुरीचं असतं. आपल्या महोपनिषदात एक श्लोक आहे.
'अयः निजः परो
वेति गणना लघु चेतसामा !
उदारचरितानां तु
वसुधैव कुटुंम्बकम !
अर्थात- हे माझे, ते त्याचे ही विचारधारा संकुचित आहे. उदारहृदयाच्या लोकांसाठी तर ही संपूर्ण वसुधा (धरती) एका कुंटुबासमान आहे. कित्ती सुंदर विचार आहे. आपल्या भारतीय संसदेच्या प्रवेशद्वारावरही हे वाक्य (वसुधैव कुंटुम्बकम) लिहिले आहे.
माणसं माणसांपासून वेगळीवेगळी का होतात, तर आपली मते आपण इतरांच्यावर लादण्याचा प्रयत्न करतो. आपण हे ध्यानात ठेवायला हवं, प्रत्येक व्यक्तीला तिची अशी एक स्वतंत्र विचारसरणी असते. आपण संवादाने आपलं मत पुढच्या व्यक्तीला पटवून देऊ शकतो.
सासरी आलेल्या मुलीनेच तडजोड करावी या अपेक्षांचे ओझे तिच्यावर लादण्याच्या आधी, तिच्या गुणदोषांसह तिला स्वीकारायला हवं, तिच्याही स्वतःच्या इच्छा आकांक्षा असतात, हे ध्यानी घ्यायला हवं.
मुलींनीही स्वतःचे आभाळ शोधता शोधता समोरच्यांना आहे तसं स्वीकारायला हवं. कुटुंबप्रमुखाने नीरक्षीरविवेक न्यायाने घरात राहिलं पाहिजे. कित्येक घरात हे कुटुंबप्रमुख आणि त्यांची बायकामुलं इतरांवर हुकुम गाजवताना दिसतात.
स्वतंत्र मत असलेल्या लोकांना हे अन्यायी वागणं सहन होत नाही, अन् कुटुंब वेगळी होतात. याचे आरोप मात्र बाईवर होत रहातात. बाईमुळं घर फुटलं... भाऊ.. भाऊ दूर झाले. मुळात पहिले बाईला दोष देणं बंद व्हायला हवं. तिला घरात सन्मान लाभला पाहिजे.
घरातील आर्थिक प्रक्रियेत तिला सामावून घेतले पाहिजे. मुलींनीही पारदर्शक व्यवहार ठेवून वेळोवेळी वरिष्ठांचा सल्ला घेतला पाहिजे. खरंतर कुटुंबसंस्थेची माळ एकमेकांना सन्मान देऊन, प्रेमाच्या धाग्याने गुंफली जायला हवी.
कुटुंबातील प्रत्येक घटक महत्त्वाचा समजला गेला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला सन्मान आणि पूर्ण हक्क मिळालेच पाहिजेत, तरच एकत्र कुटुंब पद्धती राहतील. तुमचं नातं विश्वासाचे, संवादी, घट्ट, समजून घेणारे असेल तर ते कसे फुटेल.
उगाचच सारं खापर बाईच्या माथ्यावर फोडणारे लोक स्वतःला स्वतःचे मत नसणारे असतात. कुटुंबप्रमुखाने न्याय्य वागणं ठेवलं तर नात्याचा ऱ्हास होणार नाहीच. पृथ्वीतलावर केवळ माणसाला सद् विवेकबुध्दीचे वरदान मिळाले आहे.
या गुणाचा उपयोग करुन निसर्ग, पशुपक्षी, वनस्पती या साऱ्यांचा आदर करुन आपसात गुण्यागोविंदाने नांदण्याची कला साध्य व्हायला हवी. 'हे विश्वची माझे घर' म्हणतं जगूया आणि जगू देऊया.
- स्वप्नजादेवी घाटगे (कोल्हापूर)