१९४७ साली अखंड भारताची फाळणी होऊन १४ ऑगस्ट रोजी 'पाकिस्तान' नावाचे एक नवीन राष्ट्र भूतलावर उदयास आले. ही फाळणी अत्यंत विचित्र स्वरूपाची होती. एक भाग भारताच्या पश्चिमेस आणि दुसरा भाग पूर्वेस (आजचा बांगलादेश) असं असंतुलित भौगोलिक स्वरूप होतं.
या दोन भागांमधील अंतर हजारो मैलांचं होतं, आणि केवळ भौगोलिकच नव्हे तर भाषिक, सांस्कृतिक आणि मानसिकतेचंही दुरावं होतं. हे असमतोल समीकरण फार काळ टिकणं शक्य नव्हतं. परिणामी, १९७१ मध्ये भारताने निर्णायक हस्तक्षेप करत पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांगलादेश स्वतंत्र झाला.
पाकिस्तानच्या तुलनेत भारत हा अनेक बाबतींत अद्वितीय देश आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत पाकिस्तान फक्त उत्तर प्रदेश व बिहारच्या एकत्रित क्षेत्रफळाएवढाच आहे. लोकसंख्या ही देखील भारतातील मुस्लिमांच्या एकूण संख्येइतकीच आहे.
पाकिस्तानमध्येही सुमारे पावणेकोटी हिंदू, शीख आणि इतर अल्पसंख्यांक आहेत. त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेपेक्षा लहान आहे. एकूणच, सामूहिक शक्ती आणि क्षमतेच्या बाबतीत पाकिस्तान भारताच्या तुलनेत खूपच दुबळा आहे.
पाकिस्तानमध्ये पंजाब, सिंध, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान ही चार प्रमुख राज्यं आहेत. त्यापैकी बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा हे अत्यंत मागासलेले आणि असंतोषग्रस्त भाग आहेत. पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी व्यवस्थेवर पंजाब प्रांताचा अतिरेक पगडा आहे.
विशेषतः बलुचिस्तानमध्ये असंतोष इतका तीव्र आहे की, सतत स्वातंत्र्याची मागणी केली जात आहे. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असून, या भागात स्वतंत्रतेचा घोष कधीही प्रत्यक्षात उतरू शकतो. राजकीय पातळीवरही पाकिस्तान अस्थिरतेच्या गर्तेत अडकलेला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांचा 'तहरीक-ए-इन्साफ' पक्ष बहुमताने विजयी झाला, तरीही अल्पमताच्या पक्षाला लष्कराच्या पाठिंब्याने सत्तेवर बसवण्यात आले. इम्रान खान आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले.
त्यामुळे लष्कराविषयी जनतेत प्रचंड असंतोष आहे. या देशातील एक विलक्षण बाब म्हणजे : इथे कोणत्याही धार्मिक पक्षाला सत्तेत स्थान नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. महागाई आणि बेरोजगारीने सर्वसामान्य जनता होरपळत आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) नुकतीच दिलेली मदत नसती, तर देश दिवाळखोरीत गेला असता. पाकिस्तानची आर्थिक स्थिती श्रीलंकेपेक्षा वाईट अवस्थेत आहे. शेजारी देशांशी पाकिस्तानचे संबंध देखील अत्यंत तणावपूर्ण आहेत.
अफगाणिस्तानमधील तालिबान संघटना पाकिस्तानविरोधी भूमिकेत आहे. अमेरिकेच्या मदतीने चाललेल्या तालिबानविरोधी युद्धात पाकिस्तानने अमेरिका समर्थित लष्कराला आधार दिला होता. त्यामुळे तालिबानच्या दृष्टिकोनातून पाकिस्तान हा धोकेबाज देश आहे.
दुसरीकडे इराण – जो अमेरिका विरोधी देश आहे – त्याचेही पाकिस्तानशी संबंध तणावपूर्ण आहेत, कारण पाकिस्तान हा अमेरिकेचा जवळचा सहकारी मानला जातो. ही परिस्थिती स्पष्टपणे दाखवून देते की, आंतरराष्ट्रीय राजकारणात धर्म नव्हे, तर अर्थकारण आणि जागतिक ब्लॉकची भूमिका महत्त्वाची असते.
पाकिस्तान अमेरिकेच्या ब्लॉकचा भाग आहे, तर इराण आणि अफगाणिस्तान हे चीनच्या प्रभावाखालील राष्ट्रं मानले जातात. तर मग, भारताच्या तुलनेत इतक्या बाबतींत दुबळा असलेला पाकिस्तान भारताशी बिनधास्त टक्कर घेण्याची हिंमत कशी दाखवतो.? याचे उत्तर एका ओळीत – 'अमेरिकेच्या पाठबळामुळे.!'
मध्य आशियात पाकिस्तानचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच अमेरिका संपूर्ण मध्य-पूर्व आशियावर लक्ष ठेवण्यासाठी पाकिस्तानला आपला हस्तक म्हणून वापरत आहे. पाकिस्तानशी युद्धाचा अर्थ थेट अमेरिका विरोधात उभं राहणं असा होतो.
याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताला आला. भारताने पाकिस्तानवर प्रभावी हल्ला चढवून पीओके काबीज करण्याची वाट मोकळी केली असताना, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हस्तक्षेप करून युद्धविराम घडवून आणला.
पाकिस्ताननेही "शत्रूचा शत्रू आपला मित्र" या नीतीचा अवलंब करत चीनसोबत मैत्री केली आहे. ‘पाकिस्तान’ या शब्दाचा अर्थ ‘पवित्र भूमी’ असा असला, तरी प्रत्यक्षात तेथे असणारी अराजक व्यवस्था आणि अस्थिरता पाहता तो ‘बनाना रिपब्लिक’ (म्हणजेच लाचार आणि अस्थिर राष्ट्र) असं संबोधणं योग्य ठरतं.
अमेरिकेच्या सातत्याने दिलेल्या आर्थिक व लष्करी मदतीमुळेच पाकिस्तान टिकून आहे. ९ मे २०२५ रोजी अमेरिकेने दिलेली १ अब्ज डॉलरची मदत नसती, तर पाकिस्तान भारताशी युद्ध सुरू ठेऊ शकला नसता. स्वबळावर या देशाने अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र होणं शक्यच नव्हतं, हे अगदी सामान्य माणसालाही कळेल इतकं स्पष्ट आहे.
इतिहास साक्षी आहे – पाकिस्तानात कोण पंतप्रधान व्हावा, हे ठरवण्याचं अंतिम अधिकार अमेरिकेकडेच आहे. इम्रान खान यांनी जेव्हा अमेरिकेला अफगाणिस्तानसाठी लष्करी तळ देण्यास नकार दिला, तेव्हा त्यांची सत्ता उलथवून टाकण्यात आली. पाकिस्तानची सत्ता ही अमेरिकेच्या हातातील कठपुतळीप्रमाणे आहे.
याच कारणामुळे पाकिस्तानला 'अमेरिकेचा ५१ वा राज्य' म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते – 'हा पाकिस्तान नव्हेच' – हे आहे ‘अमेरिकेस्तान’!
- आर्किटेक्ट अर्शद शेख, अहिल्यानगर
(टीप : लेखाचा उद्देश Geopolitical वास्तव मांडणे आहे. वाचकांनी यातील विश्लेषणाचा विचार खुल्या मनाने करावा.)