स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांची अर्धांगिनी आणि स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची मातोश्री हीच जिजाऊ मांसाहेबांची ओळख अपुरी ठरते. त्या केवळ थोर माता नव्हत्या; तर त्या 'महाराष्ट्राच्या राजकारणातील स्वतंत्र विचारसरणीने कार्य करणाऱ्या पहिल्या तेजस्विनी' होत्या.
मांसाहेबांचे कर्तृत्व म्हणजे एक प्रेरणादायी इतिहास. शहाजीराजांची बुद्धिमान पत्नी म्हणून स्वतःचे आयुष्य मर्यादित न ठेवता, त्यांनी मराठ्यांचे स्वतंत्र राज्य उभे करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. ‘स्वराज्य’ ही कल्पना शिवरायांच्या मनात रुजवणं, त्यांना घडवणं आणि या विचारासाठी मार्गदर्शन करणं हे त्यांचं आयुष्यभराचं कार्य होतं.
परंतु, जिजाऊंचं योगदान याहून अधिक व्यापक आहे. राज्य म्हणजे केवळ सिंहासन नव्हे, तर प्रजेचे कल्याण हेच खरे राज्यकर्म, ही विचारधारा त्यांनी शिवरायांना दिली. शिवाजी महाराजांच्या महत्त्वाच्या निर्णयांमागे जिजाऊंचा सल्ला असायचा.
पुण्याची जहागिरी सांभाळणं असो, न्यायनिवाडे करणे असो, वा संकटप्रसंगी संपूर्ण राजव्यवस्था समर्थपणे सांभाळणे – मांसाहेब हे 'उत्तम प्रशासक, कुशल राजकारणी, नीतिमान मार्गदर्शक आणि समजूतदार माता' होत्या.
शहाजीराजे आदिलशहाच्या कैदेत असताना सूचक डावपेचांची आखणी करणे, मिर्झाराजांच्या आग्रहाने शिवराय औरंगजेबाला भेटायला गेले असताना राज्याची जबाबदारी सांभाळणे – या सर्वांमध्ये त्यांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडते.
त्या कोणत्याही कर्मकांडात गुंतल्या नाहीत, पण सत्य, कर्तव्य आणि ध्येय यांना प्राधान्य देऊन स्त्रीशक्तीला नवी दिशा दिली. आजही पावलं डळमळीत झाली की मांसाहेबांचा बुलंद आवाज ऐकू येतो..
"मुली, भारताच्या मुली लढणाऱ्या आहेत, लढलीस तर घडशील… आणि घडवशील.!" मांसाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
- स्वप्नजादेवी घाटगे (कोल्हापूर)