अहिल्यानगर – केडगाव औद्योगिक परिसरात २२ जून रोजी सकाळी एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत सापडल्याची घटना समोर आली होती. नागछाप हिंग कंपनीच्या मोकळ्या जागेत हा इसम बेशुद्ध स्थितीत आढळून आला होता.
त्याच्या अंगावर गंभीर मारहाणीचे वळ, जखमा असल्याने स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. जखमीला सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार मयतावर कठीण व टणक वस्तूने हल्ला झाल्याचे निष्पन्न झाल्याने तपासाचा कल खुनाकडे वळवण्यात आला.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपासात सक्रिय झाले.
पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाने केडगाव परिसरातील तसेच केडगाव ते कायनेटिक चौकदरम्यानच्या सुमारे २५ सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले.
तांत्रिक व गोपनीय माहितीच्या साह्याने तीन संशयितांना ताब्यात घेतले. संदेश संजय क्षेत्रे (२५), अमन असीरमिया शेख (२३), आणि मंगेश कालीदत्त कांबळे (२१) – तिघेही केडगाव, अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत.
आरोपींकडून तपासाच्या दरम्यान धक्कादायक माहिती पुढे आली. २२ जून रोजी रात्री २ वाजता पुणे बसस्टँडजवळ रस्त्यावर थांबलेल्या अनोळखी इसमाला त्यांनी जबरदस्तीने मोपेडवर बसवून केडगाव इंडस्ट्रियल परिसरात नेले.
तेथे त्याच्यावर लाकडी काठी व दगडाने जबर मारहाण करून त्याच्याकडील बॅग, रोख रक्कम, एटीएम कार्ड हिसकावून घेतले. आरोपींनी मृताच्या एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पिन चुकीचा असल्याने पैसे निघाले नाहीत.
पोलिसांनी आरोपी मंगेश कालीदत्त कांबळे याची झडती घेतली असता त्याच्याकडून मयताचे आधारकार्ड सापडले. त्यावरून मृत व्यक्तीची ओळख बोबडा अनारसिंग (रा. सुखपुरी, जैनाबाद, बुरहानपूर, मध्यप्रदेश) अशी पटली.
सध्या तिन्ही आरोपी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास सुरु आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तडफदार तपासामुळे अवघ्या दोन दिवसांत हा गूढ खून उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.