अहिल्यानगर - राहुरी तालुक्यात चिंचोली शिवारात प्रवरा नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या सात आरोपींविरोधात विशेष पोलिस पथकाने कारवाई केली असून एकूण २८ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ जून रोजी करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने चिंचोली येथील विरभद्र मंदिर व स्मशानभूमी परिसरात छापा टाकला. यावेळी काही इसमे प्रवरा नदीपात्रातून यारीच्या सहाय्याने वाळू उपसा करून ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये भरत असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी पाठलाग करून शंकर भोसले, शहादेव माने व अभिषेक नाचणे या तिघांना ताब्यात घेतले. पाच आरोपी फरार असून त्यांची नावे गणपत गफले, निखील लाटे, संदीप लाटे, दीपक लाटे इत्यादी अशी आहेत.
घटनास्थळी एक डंपर, एक हायवा, दोन ट्रॅक्टर, जेसीबी यासह अंदाजे १८ ब्रास वाळू असा एकूण २८,०८,००० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुढील कारवाईसाठी मुद्देमाल महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५(ई), ३(५) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कलम ३/१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच दिवशी राहुरी येथील एकलव्य वसाहतीत एका महिलेकडून गावठी हातभट्टीची २५ लिटर तयार दारू सापडल्याने तिच्याविरुद्ध २,५०० रुपये किमतीच्या मुद्देमालासह महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष खाडे व त्यांच्या विशेष पथकाने केली आहे.
या पथकात पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहायक फौजदार शकील शेख, हेड कोन्स्टेबल शंकर चौधरी, अरविंद भिंगारदिवे, अजय साठे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनिल दिघे, अमोल कांबळे, जालिंदर दहिफळे यांचा समावेश होता.