येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर – शहरातील बागडपट्टी परिसरात बुधवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सीताराम सारडा शाळेत शिकणाऱ्या इयत्ता दहावीतील १४ वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून त्याच शाळेत शिकणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्याने केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ही दुर्दैवी घटना शाळेच्या परिसरातच घडल्याने पालक वर्गात मोठी चिंता पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, किरकोळ वादातून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि तो थेट चाकूहल्ल्यापर्यंत गेला. जखमी अवस्थेतील मुलाला काही प्रत्यक्षदर्शींनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखा आणि तोफखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी व फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले.
विधीसंघर्षग्रस्त बालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. शाळेतच असा हिंसक प्रकार घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
या घटनेनंतर पालकांकडून संताप व्यक्त केला जात असून, या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे पालकही धास्तावले आहेत. दरम्यान, शाळा प्रशासनाने अद्याप याबाबत काहीही माहिती दिलेली नाही.