शाब्बास ! बाणेश्वर महाविद्यालयात 'कॅम्पस ड्राइव्ह'द्वारे ८ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड


अहिल्यानगर – श्री बाणेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्लेसमेंट सेल व IQAC विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कॅम्पस रिक्रूटमेंट प्रोग्राम'ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

केंद्र सरकारच्या युवा व कौशल्य विकास योजनेअंतर्गत आयोजित या उपक्रमात नामवंत औद्योगिक संस्था 'कायनेटिक इंजिनीअरिंग लिमिटेड' मार्फत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली.

या उपक्रमात महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना मोफत तांत्रिक प्रशिक्षण आणि आकर्षक प्रशिक्षण भत्ता दिला जाणार आहे.

कॅम्पस मुलाखतीसाठी कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक सुनील मुंडलीक आणि इंजिनीयर ॲड. कैलाश दिघे प्रमुख उपस्थित होते.

श्री. मुंडलीक यांनी विद्यार्थ्यांना कंपनीची कार्यपद्धती, सध्याच्या आणि भावी रोजगाराच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन केले, तर ॲड. दिघे यांनी संवादकौशल्य, निर्णयक्षमता आणि कौशल्य विकास योजनेचे महत्व पटवून दिले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव यांनी विद्यार्थ्यांना असे उपक्रम संधी मानून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

या कार्यक्रमास IQAC समन्वयक डॉ. शेख एच. आर., परीक्षा विभाग प्रमुख डॉ. बी. एम. मुळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कॅम्पस ड्राइव्हच्या माध्यमातून एकूण ८ विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली असून, ही महाविद्यालयासाठी गौरवाची बाब आहे.

या यशाबद्दल श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक मा. आमदार शिवाजीराव कर्डिले, संचालक युवा नेते अक्षय दादा कर्डिले व प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहिते मॅडम यांनी केले, सूत्रसंचालन पठाण मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन राऊत मॅडम यांनी केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !