हेरंब कुलकर्णीं यांना गिरीश गांधी सामाजिक-राजकीय कार्य पुरस्कार

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

वर्धा – प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांना नागपूर येथील सी. मो. झाडे फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘गिरीश गांधी सामाजिक व राजकीय कार्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. 


एक लाख रुपयांचा हा पुरस्कार येत्या ६ जुलै रोजी सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधी आश्रमात डॉ. अभय बंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी दिल्लीच्या मीनाक्षी नटराजन विशेष उपस्थितीत राहणार आहेत.

ही माहिती भारती झाडे आणि पत्रकार विकास झाडे यांनी दिली..हा पुरस्कार सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्र यांच्या माध्यमातून देण्यात येतो.

यापूर्वी डॉ. एस.एन. सुब्बाराव, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. रवी व डॉ. स्मिता कोल्हे, संजय नहार, डॉ. सतीश गोगुलवार, शुभदा देशमुख आणि पारोमिता गोस्वामी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

हेरंब कुलकर्णी यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर एकल महिला, भटके-विमुक्त समाज, दारूबंदी, वंचितांचे शिक्षण, बालविवाह अशा अनेक गंभीर सामाजिक प्रश्नांवर सखोल अभ्यास करून कृतीशील काम सुरू केले.

त्यांनी महाराष्ट्रातील ८० तालुक्यांमध्ये ‘साऊ एकल महिला समिती’चे प्रभावी नेटवर्क उभे केले असून, एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे हे त्यांच्या कार्याचे ठळक पैलू आहेत.

दारुबंदीसाठी विविध आंदोलने उभारून अवैध दारूविक्रीविरोधात त्यांनी कार्य केले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांत फिरून दारिद्र्याचा अभ्यास, तसेच राजस्थान व बिहारमधील बालविवाह विषयावर संशोधन केले आहे. 

याच विषयावर त्यांचे नवे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यांच्या आतापर्यंत १२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. या पुरस्कार वितरणानिमित्त ‘मजबुती का नाम महात्मा गांधी’ या विषयावर देशभरातील १०० तरुणांसाठी दोन दिवसांचे वैचारिक शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात देशभरातील मान्यवर मार्गदर्शक सहभागी होणार असून, हेरंब कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत देखील होणार आहे.

“महात्मा गांधींच्या प्रेरणेने ‘अंतिम आदमी’साठी काम करावेसे वाटते. आणि अशा सेवाग्राम आश्रमात हा पुरस्कार मिळतो आहे, याचा खूप आनंद आहे,” अशी भावना हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !