शेवगाव (अहिल्यानगर) - 'बालकांचा पालकांवर जितका विश्वास असतो, त्याहीपेक्षा अधिक विश्वास ते शिक्षकांवर ठेवतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशक होऊन, बाललैंगिक अत्याचारांना प्रतिबंध करणारे कायद्याचे जागरुक दूत व्हावे,' असे मार्मिक प्रतिपादन शेवगाव न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आर. आर. भद्रे यांनी केले.
शेवगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (POCSO) व बालहक्क जनजागृती शिबिरा’त ते अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करत होते.
या शिबिरात सहन्यायाधीश मा. डी. आर. कुलकर्णी यांनी POCSO कायद्याची सखोल माहिती देत, पालकांनी व पीडित बालकांनी कायदेशीर मार्गाचा उपयोग कसा करावा, हे स्पष्ट केले.
अनेकदा पालक बदनामीच्या भीतीने किंवा मुलीचे शिक्षण अडथळ्यात येईल या कारणाने अत्याचार लपवतात. हा अन्याय सहन केल्यामुळे गुन्हेगार अधिक धीट होतात, असेही न्यायाधीश भद्रे यावेळी म्हणाले.
त्यामुळे अशा वृत्तींना रोखण्यासाठी पालकांनी आणि मुलींनी निर्भय होऊन कायद्याचा आधार घ्यावा, असे आवाहन न्या. आर. आर. भद्रे (शेवगाव न्यायालय) यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमास वकील संघाचे उपाध्यक्ष श्री. व्ही. ए. भेरे, सचिव संभाजीराजे देशमुख, प्रा. संजय कुलकर्णी, श्री. हरीश भारदे, श्री. सदाशिव काटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. मिनानाथ देहादराय यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऍड. सुहास चव्हाण यांनी मानले.