'खऱ्या लेखकाशी भेट' ! बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा बालमित्रांसोबत संवाद


शेवगाव (अहिल्यानगर) – 'ज्यांची कविता आपण रोज शाळेच्या पुस्तकात वाचतो, ते खरेखुरे लेखक आपल्या वर्गात आले तर?', हे अगदी निरागस स्वप्न भापकर वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रत्यक्षात उतरवले.

इयत्ता पहिली व दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या कविता आणि धड्यांचे लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी या शाळेला नुकतीच भेट दिली आणि विद्यार्थ्यांना अविस्मरणीय अनुभव दिला.

छोट्या चिमुकल्यांशी संवाद साधताना आव्हाड यांनी त्यांना गोष्टी, कविता आणि गाणी ऐकवली. त्यांच्या शब्दांतला गोडवा आणि सहजता मुलांना मोहवून टाकणारी होती. मुलांनी देखील प्रचंड उत्साहाने सहभाग घेतला.

आपल्या पुस्तकात ज्यांच्या कविता आहेत ते लेखक समोर उभे आहेत, आपल्या कवितांना अर्थ समजावून सांगत आहेत.. ही आनंदाची भावना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

त्यांच्या कवितांच्या पानांवर सही घेण्यासाठी मुलांनी एकच गर्दी केली. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती तागडे व सहशिक्षिका श्रीकांता शिंदे यांच्या पुढाकाराने आणि नियोजनाने हा सुंदर उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाचे कौतुक करताना श्री. आव्हाड म्हणाले, 'भापकर वस्ती शाळा ही खऱ्या अर्थाने उपक्रमशील व विद्यार्थिकेंद्रित शिक्षण देणारी शाळा आहे.' याप्रसंगी शाळेच्या वतीने श्री. आव्हाड यांचा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात केंद्रप्रमुख रघुनाथ लबडे, गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ, माजी सरपंच अण्णासाहेब रुईकर, तसेच शाळा समिती अध्यक्षा जयाताई भापकर यांचीही उपस्थिती लाभली.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शाळा आणि साहित्य यामधील नाते अधिक घट्ट करणारा हा अनोखा प्रयत्न सर्व स्तरातून कौतुकास पात्र ठरतो आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !