अहिल्यानगर – श्री शनीशिंगणापुर देवस्थान येथे आर्थिक कारभारातील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करत भाजप कार्यकर्ते तथा शनिभक्त विशाल सुरपुरिया यांनी धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून भाविकांच्या नावाने आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशाल सुरपुरिया यांनी निवेदनात, विश्वस्त मंडळाने तांत्रिक माध्यमांचा वापर करत काही आर्थिक व्यवहारात अनियमितता केल्याचे नमूद केले आहे.
या प्रकाराची सखोल चौकशी होण्यासाठी महाराष्ट्र सायबर क्राईम विभाग व आर्थिक गुन्हे शाखा (EOW), मुंबई यांच्यामार्फत तपासाच्या सूचनाही देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तक्रारीत, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सध्याचे विश्वस्त मंडळ तात्काळ बरखास्त करावे व त्याऐवजी स्वतंत्र प्रशासक नेमावा, अशी विनंती अॅड. अमित सुरपुरिया आणि अॅड. स्वाती जाधव यांच्यामार्फत केली आहे.
विशाल सुरपुरिया यांनी यापूर्वीही मुख्यमंत्री, वरिष्ठ पोलीस अधिकारी व संबंधित यंत्रणांकडे निवेदने सादर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र अद्याप कोणती ठोस कारवाई न झाल्यामुळे, यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
देवस्थानची शंभर वर्षांची पारंपरिक सेवा व श्रद्धा अबाधित ठेवत या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी योग्य ती चौकशी करून भाविकांच्या विश्वासाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.