अहिल्यानगर - राहुरी (Rahuri) तालुक्यात आतापर्यंत पोलिसांना डोकेदुखी ठरलेली आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र दहशत निर्माण करणारी वाळू तस्करांची कुख्यात टोळी अखेर कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी (DSP) या टोळीतील चार सराईत गुन्हेगारांना तब्बल एक वर्षाकरिता जिल्हाबंदीची शिक्षा सुनावली आहे. या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या टोळीचा प्रमुख दिपक बबन लाटे (रा. चिचोली, वय 36) याच्यासह निखील बबन लाटे, शंकर राजेंद्र भोसले, शहादेव विठ्ठल माने, अभिषेक राजेंद्र नाचणे, गणपत बबन गफले, संदीप गोपीनाथ लाटे, आदींनी गेल्या काही वर्षांपासून राहुरी परिसरात गुन्ह्यांची मालिका राबवत दहशतीचे साम्राज्य उभारले होते.
महिलांचा छळ, घरात घुसून मारहाण, गावातील नागरिकांना दमदाटी, सार्वजनिक ठिकाणी वाद निर्माण करणे, तसेच बेकायदा शासकीय वाळू चोरीचे रॅकेट चालवून लाखोंचा गैरव्यवहार.. अशा सराईत गुन्ह्यांमुळे (Crime) सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले होते.
तक्रार करायलाही लोक घाबरले - टोळीच्या वाढत्या अत्याचारांमुळे नागरिक पोलिसांकडे तक्रार किंवा माहिती देण्यासाठीही पुढे येत नव्हते. अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई करूनही टोळीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही.
त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने भविष्यातही गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
पोलीस निरीक्षकांचा प्रस्ताव, SDPOचा अहवाल जाताच अखेर जिल्हाबंदीचे आदेश आले. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत संबंधित टोळीला दोन वर्षांसाठी जिल्हाबंदीची शिफारस केली होती.
या प्रस्तावाची सखोल चौकशी करून श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी अहवाल सादर केला. यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी टोळीप्रमुख दिपक लाटे व तीन सदस्यांना एक वर्षाकरिता अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले. उर्वरित टोळी सदस्यांवरही लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुन्हेगार टोळ्यांविरुद्ध मोठी मोहीम - जिल्ह्यात संघटित गुन्हे, गोवंश कायदा, हत्यार कायदा आणि वाळू चोरीसारख्या बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्या टोळ्यांवर कठोर कारवाई सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आणखी काही टोळ्यांची माहिती संकलित होत असून त्यांनाही लवकरच हद्दपारीचा फटका बसणार आहे.

