अहिल्यानगर - 'घंटा पुन्हा वाजली... वर्ग पुन्हा भरला... आणि डोळ्यांत पुन्हा दहावीच्या आठवणी दाटल्या!' असा भावनांनी ओथंबलेला क्षण अनुभवला श्री खंडेश्वर विद्यालय (Khandeshwar School) दैठणे गुंजाळ येथे. जिथे २००२-०३ च्या दहावी (SSC) ‘अ’ तुकडीतील विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात पार पडला.
तब्बल २२ वर्षांनी एकत्र आलेल्या सहाध्यायांनी शाळेच्या प्रांगणात आनंद, आठवणी आणि कृतज्ञतेची रंगतदार मैफिल रंगवली. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून सुरू झालेली ही कल्पना प्रत्यक्षात साकारली गेली.
शाळेच्या आवारात रंगीत रांगोळ्या, जयघोष आणि फुलांच्या पायघड्या यांमध्ये शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेच्या स्वरांत वातावरण भारावून गेले. जुन्या बाकांवर बसताना प्रत्येकाच्या मनात शालेय दिवस पुन्हा जिवंत झाले.
दरम्यानच्या काळात दिवंगत झालेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करत सर्वांनी एक क्षण मौन पाळले. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मुख्याध्यापक (Head Master) लक्ष्मण दारकुंडे आणि शिक्षक संपत येणारे, महेश जाधव, संभाजी पानमंद, बाबा जासूद, राधाकृष्ण मगर, काशिनाथ महांडूळे, कानिफनाथ गुंजाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाले.
विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित ध्यानपुस्तक, सन्मानचिन्ह व रोपटे भेट देत आपुलकीचा मान व्यक्त केला.
दारकुंडे सर म्हणाले, 'शिक्षक-विद्यार्थी नातं हे आयुष्यभर टिकणारं असतं. आज तुमच्या चेहऱ्यांवर दिसणारा आदर म्हणजे आमच्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे.' माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रांतील यशाबद्दल अभिमान व्यक्त केला.
स्नेहमेळाव्यात बापू गुंजाळ यांनी सादर केलेली ‘आई’वरील कविता (Poem) आणि समीर गुंजाळ यांची रंगतदार लावणी यांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. गीतांजली येवले, स्मिता केदार आणि इतर सहाध्यायांनी अनुभवकथन, जोक्स आणि आठवणींनी वातावरण रंगवले.
कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरासाठी चिकू, पेरू आणि विविध फळझाडे भेट दिली तसेच शाळेला १० सिलिंग फॅन देण्याची घोषणा केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वित्त व लेखा अधिकारी महेश कावरे, बाळू गुंजाळ, सतीश येवले यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले. बाळू गुंजाळ यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला तैवान पिंक पेरूचे रोप भेट दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर गुंजाळ यांनी, प्रास्ताविक बापू गुंजाळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख सतीश येवले यांनी करून दिली, तर आभार प्रदर्शन स्मिता केदार यांनी केले.
'पसायदान'च्या मंगल गजरात कार्यक्रमाची सांगता झाली. डोळ्यांत पाणी आणि चेहऱ्यावर हास्य घेऊन सर्वांनी पुन्हा भेटण्याचा संकल्प केला आणि शाळेच्या आवारात पुन्हा एकदा 'गुरु-शिष्य नात्याची' तेजस्वी झळाळी अनुभवली.
