अहिल्यानगर - जिल्ह्यातील तब्बल ९७० गावे बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. वाढत्या मानव-बिबट (Leopard) संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीची पावले उचलली आहेत.
कर्जत (Karjat), जामखेड (Jamkhed) आणि पाथर्डी (Pathardi) हे तीन तालुके वगळता उर्वरित ११ तालुक्यांत बिबट्यांची वाढती हालचाल नोंदवली जात आहे. अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण असून गेल्या महिन्यात दोन जणांचा बळी गेला तर दोघे जखमी (Injured) झाले.
सर्वाधिक प्रभावित तालुके - अकोले (१९१), संगमनेर (१७१), पारनेर (१३१), नेवासा (१२७), राहुरी (९६), कोपरगाव (७९), राहाता (६१), श्रीरामपूर (५६), श्रीगोंदा (१४), शेवगाव (२४) आणि अहिल्यानगर तालुका (२०) अशी गावांची संख्या नोंदवण्यात आली आहे.
प्रशासनाचे निर्देश - मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना खालील उपाय तत्काळ राबविण्याचे आदेश दिले आहेत.
- जनजागृती मोहिमा अनिवार्य :
- प्रत्येक गावात ‘बिबट प्रतिबंध व सुरक्षा’ सूचना फलक
- ग्रामसभा व विशेष सभांमध्ये वनविभागाच्या सूचनांचे वाचन
- शाळांची वेळ सकाळी ९.३० ते सायं. ४
- विद्यार्थ्यांच्या ने-आणची जबाबदारी ग्रामपंचायती व शिक्षकांवर
पाच वर्षांचा संघर्ष : गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात २७ जणांचा मृत्यू, १७८ जखमी, तर ११,१६८ पशुधन हानी झाली आहे. फक्त २०२४-२५ मध्येच ८ मृत्यू आणि ४,५१२ पशुधन हानी नोंदवली गेली. नुकसान भरपाई म्हणून प्रशासनाने ₹६ कोटी ९४ लाख ७ हजार रुपये वितरित केले आहेत.
जिल्हा परिषदेचे आवाहन - “ग्रामस्थांची सुरक्षा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. प्रत्येक गावाने जनजागृती प्रभावीपणे राबवावी,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (ZP CEO Anand Bhandari) यांनी सांगितले.
- नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी
- पहाटे व सायंकाळी एकटे शेतीकाम टाळा
- टॉर्च, काठी, शिटीचा वापर करा
- पाळीव जनावरे रात्री सुरक्षित ठिकाणी ठेवा
- वनविभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा
प्रशासनाच्या उपाययोजना आणि नागरिकांच्या सतर्कतेनेच मानव-बिबट संघर्ष रोखण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 'सावध रहा, सुरक्षित रहा'.
