माननीय थो. जा. देऊबाईंनी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली होती की, 'शासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर २०२५ चे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळीपूर्वी देऊ', परंतु निवृत्तीवेतन (Pention) हे दिवाळीपूर्वी न मिळता, नेहमीप्रमाणे महिन्याच्या शेवटच्या दिवशी, ३१ऑक्टोबरलाच प्राप्त झाले.!
ती सुखद घोषणा ऐकल्यावर एक पेन्शनर म्हणून माझा दिवाळीचा आठवडा कसा गेला, त्याचा घेतलेला हा विनोदी, गंमतीशीर आढावा...
दिवाळीचे दोन दिवस,
घोषणा ऐकल्याच्या आनंदात गेले..
दोन दिवस,
निवृत्तीवेतनाची वाट पाहण्यात गेले..
दोन दिवस, चिंतेत गेले..
दोन दिवस, निराशेच्या गर्तेत गेले..
'लक्ष्मीपूजनाला, 'घरात आहे का लक्ष्मी?'
ऐसी खेकसली गृहलक्ष्मी !
खडे खडेच ऐकले,
तिचे ते बोल खडे
गृहस्वामी नामधारी,
हे मम पितळ पडले उघडे!
तात्पर्य,
पिंजऱ्यामाजी व्याघ्र सापडे,
बायकामुले मारिती खडे !
दिवाळीचा सण मोठा,
नाही आनंदाला तोटा,
असे नुसतेच म्हणायचे!
पेन्शनशिवाय दिवाळीचे दिवस
आता कसेतरी काढायचे !
सगळीकडे,
दिवाळी पहाट, दिवाळी पहाट!
लोकांच्या आनंदाला नाही पारावार!
इकडे मात्र आम्हा पेन्शनरांची..
रणरणती दुपार! रणरणती दुपार!!
पाहू रे किती पेन्शनची वाट?
वाट पाहण्यातच लागली
दिवाळीच्या आनंदाची वाट.!
पण आता मात्र मला अशी दाट शंका येते की, मान. थो. जा. देऊबाईंची ती घोषणा मीच नीट ऐकली नसावी. कदाचित त्या असे म्हणाल्या असतील की, 'शासकीय कर्मचाऱ्यांनो, ऑक्टोबर महिन्याचे वेतन / निवृत्तीवेतन ठरलेल्या वेळीच मिळेल ! तुम्ही आनंंदाने दिवाळी साजरी करा.

