शेवगाव (अहिल्यानगर) - तालुक्यातील अमरापूर येथील ज्येष्ठ नागरिक व अहिल्यानगर जैन स्वाध्याय संघाचे संस्थापक सदस्य मदनलाल हरकचंद चोरडिया (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
सामाजिक जाण व सेवाभाव जपणाऱ्या या ज्येष्ठ व्यक्तीने मृत्यूपूर्वी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबीयांनी देहदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या इच्छेनुसार पार्थिव विळदघाट, येथील विखे मेडिकल फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शरीररचनाशास्त्र विभागास देण्यात आले.
वैद्यकीय शिक्षणात देहदानाचे विशेष महत्त्व असून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मानवी शरीररचना समजून घेण्यासाठी तसेच संशोधनासाठी हा देह अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
मदनलाल चोरडिया हे तिलोक जैन महाविद्यालयात पर्यवेक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले संतोष चोरडिया व नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंडचे संस्थापक सुनील चोरडिया यांचे वडील होत.
विशेषतः सुनील चोरडिया यांनी अंधांच्या शिक्षण व रोजगारनिर्मितीसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. हडपसर व भोसरी येथे अंधांसाठीची दोन माध्यमिक शाळा व रोजगार केंद्राच्या माध्यमातून त्यांनी उभारलेला उपक्रम समाजात आदर्श मानला जातो.
“मृत्यूनंतरही समाजासाठी काहीतरी देऊन जावे, अशी वडिलांची इच्छा होती. त्या इच्छेचा मान राखत देहदानाचा निर्णय घेतला,” असे संतोष चोरडिया यांनी सांगितले.
अद्याप ग्रामीण भागात रक्तदान व नेत्रदानाबाबतही कमी जागृती असताना पारंपरिक क्रियाकर्म टाळून कुटुंबाने केलेला हा देहदानाचा निर्णय अत्यंत प्रेरणादायी व समाजाला दिशा देणारा म्हणता येईल.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. समाजोपयोगी कार्याची ही परंपरा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
