आश्वी बु. (अहिल्यानगर) - संगमनेर (Sangamner) तालुक्यातील छोट्याशा आश्वी बुद्रुक (Ashwi Budruk) गावातील पुनम नानासाहेब खेमनर (Poonam Khemnar) हिने क्रिकेटच्या विश्वात थेट ‘मुंबई इंडियन्स’ (Mumbai Indians) महिला संघापर्यंत मजल मारत ऐतिहासिक यश संपादन केले आहे.
सन २०२६ च्या वुमन प्रीमियर लीग (WPL) साठी तिची निवड झाली असून, संगमनेर तालुक्यातून मुंबई इंडियन्समध्ये पोहोचणारी ती पहिली महिला आणि अजिंक्य रहाणेनंतर (Ajinkya Rahane) त्याच संघात खेळणारी दुसरी खेळाडू ठरली आहे.
साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पुनमने संघर्षाचा मोठा सामना करत क्रिकेटमध्ये (Womens Cricket) स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. चार भावंडांमध्ये वाढलेली पुनम हुशार आहे. तिचा एक भाऊ मुंबई पोलिस दलात, तर दुसरा खाजगी नोकरीत आहे.
अशा कुटुंबाच्या आधारावर गावातून राज्य, राष्ट्रीय ते WPL या प्रवासाची शिडी तिने सातत्याने चढली. आश्वी बुद्रुकच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून तिच्या क्रिकेटचा पाया रचला गेला.
हार्दिक पांड्याकडून (Hardik Pandya) शिकला अॅटिट्यूड : डब्ल्युपीएलमधील (WPL) विदेशी खेळाडूंच्या सहवासात खेळताना पुनमला हार्दिक पांड्याकडून आक्रमकता, खेळातील मानसिकता आणि ‘बॅटिंग टेम्पो’ याबाबत अमूल्य मार्गदर्शन मिळाले.
या अनुभवाने तिच्या खेळाला नवी धार मिळाल्याचे पुनम वडील नानासाहेब खेमनर यांनी सांगितले. तिचा गावातून राष्ट्रीय पातळीपर्यंतचा अढळ प्रवास आहे.
इंग्लिश स्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेत असताना आश्वी खुर्द येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत क्रीडा शिक्षक बाळासाहेब विखे यांनी पुनमच्या खेळातील चमक सर्वात आधी ओळखली. सरफराज बांगडीवाले, पुण्यातील अविनाश विशदे आणि डोमेस्टिक सिझनमध्ये प्रशिक्षक आंजू जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पुनमचे कौशल्य अधिक उजळून निघाले.
२०१५–२०२० महाराष्ट्र संघातून टी-२०, वनडे स्पर्धा; २०१७–१८ गुजरात; सलग दोन सिझन नागालंड; २०२३–२४ मध्यप्रदेश; २०२५ मध्ये RCB व नंतर UP वॉरियर्समधील अनुभव—असा पुनमचा डोमेस्टिक प्रवास मजबूत पायाभरणी करणारा ठरला आहे.
ऑलराऊंडर म्हणून स्वतःची ओळख निर्माण करताना गोलंदाजीची संधी मर्यादित मिळाली. मात्र फिनिशर म्हणून खेळताना तिने अनेक वेळा ३०–५० धावांच्या महत्त्वपूर्ण खेळी केल्या. डोमेस्टिक लीगमध्ये तिच्या नावावर २०० पेक्षा अधिक धावा आहेत.
वरच्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाल्यास ५० ते १०० धावा करण्याची क्षमता असल्याचा तिला ठाम आत्मविश्वास आहे.
‘प्रवरा’ची साथ आणि पुनमची जिद्द ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी : “खाजगी कोचिंग, उपकरणे किंवा विशेष सुविधा नसतानाही गावातील मुलगी WPL पर्यंत पोहोचू शकते, याचा जिवंत पुरावा पुनम खेमनर आहे. प्रवरा शिक्षण संस्था ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे", असे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सुष्मिता विखे-पाटील यांनी सांगितले.
पुनमच्या यशामुळे ग्रामीण भारतातील खेळाडूंना नव्याने जिद्द आणि विश्वास मिळाला आहे. कुटुंबाचा आधार, योग्य प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःवरचा अढळ विश्वास असेल, तर मुली जागतिक क्रीडा विश्वातही चमकू शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे.
पुनमचा मुंबई इंडियन्समधील प्रवेश ही संगमनेर तालुक्यासाठी अभिमानाची, आणि देशभरातील ग्रामीण मुलींसाठी प्रेरणेची नवी पर्वणी ठरली आहे.
