येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बुऱ्हाणनगर (अहिल्यानगर) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील (Baneshwar College) राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धन या विषयावर आधारित एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, दिनांक १३ जानेवारी रोजी करण्यात आले होते.
स्वयंसेवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ही कार्यशाळा (Workshop) चार सत्रांत यशस्वीरीत्या पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव हे होते. पहिल्या सत्रात डॉ. शिवप्रसाद घालमे (सहाय्यक कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र, अहिल्यानगर) यांनी पर्यावरण संवर्धन या विषयावर सखोल व्याख्यान दिले.
पर्यावरणाचे (Environment) महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी वृक्षारोपण व संवर्धन, प्लास्टिकमुक्त जीवनशैली, कचरा व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. तसेच उपकेंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती दिली.
दुपारच्या सत्रात प्रा. दत्तात्रय वारकड यांनी पर्यावरण व वृक्षारोपणाची काळाची गरज अधोरेखित करत प्रत्येकाने आपल्या परिसरात झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे, असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. तिसऱ्या सत्रात पर्यावरण संवर्धन विषयक माहितीपटाचे (Documentary) निरीक्षण, गटचर्चा व प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. यामध्ये सर्व रासेयो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
चौथ्या व समारोप सत्रात उपस्थित स्वयंसेवकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी सुनील चोरमुले (माजी सैनिक व कनिष्ठ सहाय्यक, सा.फु. पुणे उपकेंद्र अहिल्यानगर), डॉ. आर. एच. शेख, डॉ. बी. एम. मुळे तसेच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेसाठी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संचालक, जिल्हा सहकारी बँक लि.चे अक्षय कर्डिले (Akshay Shivajirao Kardile) यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वाती वाघ यांनी केले, तर द्वितीय सत्रात पाहुण्यांचा परिचय प्रा. डी. एस. दिवटे यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी सागर कोहक यांनी मानले. सूत्रसंचालन इप्तीसाम पठाण यांनी केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होऊन प्रत्यक्ष कृतीची प्रेरणा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

