येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बुऱ्हाणनगर, अहिल्यानगर (Baneshwar College) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले.
हे शिबिर अहिल्यानगर तालुक्यातील आदर्श गाव मौजे मांजरसुंबा (Manjarsumba) येथे दिनांक ४ जानेवारी २०२६ ते १० जानेवारी २०२६ या सात दिवसांच्या कालावधीत उत्साहात पार पडले. “शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट व पडीक जमीन व्यवस्थापन” या संकल्पनेतून वृक्षारोपण, प्लास्टिक जलसंधारण बंधारा, प्लास्टिक बंदी, ग्रामस्वच्छता व परिसर स्वच्छता असे उपक्रम राबविण्यात आले.
या उपक्रमांच्या अंमलबजावणी दरम्यान मांजरसुंबा गावातील सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले, त्यामुळे स्वयंसेवकांमध्ये सामाजिक बांधिलकी व लोकसहभागाचे महत्त्व अधिक दृढ झाले. शिबिरादरम्यान स्वयंसेवकांसाठी आरोग्य जनजागृती, आर्थिक क्षेत्रातील डिजिटल सुरक्षितता तसेच पावसाचे पाणी साठव प्रकल्प यांसारख्या विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात आली.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष कराळे हे होते, तर प्रमुख उपस्थितीत सरपंच रूपालीताई कदम व उपसरपंच जालिंदर मच्छिंद्र कदम उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव, डॉ. आर. एच. शेख, डॉ. बी. एम. मुळे तसेच बी.एड कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिर्के सर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना सुभाष कराळे यांनी आदर्श गाव संकल्पना, सामुदायिक श्रमदान, श्रमसंस्कार आणि आरोग्याचे सामाजिक जीवनातील महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. सरपंच रूपालीताई कदम यांनी स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या, तर उपसरपंच जालिंदर कदम यांनी गाव घडविण्यात श्रमसंस्कार शिबिराचे महत्त्व अधोरेखित केले.
प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट केले आणि अशा उपक्रमांत सातत्य राखण्याचे आवाहन केले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संचालक, अ. नगर जिल्हा सहकारी बँक लि.चे अक्षय कर्डिले यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिबिरात सांस्कृतिक कार्यक्रमांत नाटक व नृत्य सादर करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून हर्षदा धाडगे व संकेत वारुळे यांची निवड झाली. तसेच उत्कृष्ट स्वयंसेवक टीम म्हणून रोहन खंडागळे व त्यांच्या टीमची निवड करण्यात आली. विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. स्वाती वाघ यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर कोहक यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकारी प्रा. राऊत पी. एस., प्रा. शिंदे आर., तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा पुंडे यांनी केले. या श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि सेवाभाव अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

