नाशिक - शहरातील प्रभाग क्रमांक ३१ मधील बूथ क्रमांक १८ (जाजू विद्यालय / शारदा विद्यालय) येथे बोगस मतदानाचा (Bogus Voting) गंभीर प्रकार आज सकाळी 9 वाजता उघडकीस आला. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदार आनंद सुधाकर कुलकर्णी (मतदार क्रमांक ८४४) हे १५ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजता मतदानासाठी बूथवर (Voting Booth) गेले असता, त्यांना धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. मतदान अधिकारी यांनी त्यांना “तुमचे मतदान आधीच झाले आहे” असे सांगितले.
![]() |
| मतदार कुलकर्णी यांची मतदार स्लीप |
यावेळी अधिकाऱ्यांनी रजिस्टरवर असलेला आधार क्रमांक व सही दाखवली. मात्र तो आधार क्रमांक आनंद कुलकर्णी यांच्या आधार कार्ड (Aadhar Card) क्रमांक (४०६४ ९२३३ २९६३) शी जुळत नव्हता. तसेच रजिस्टरवरील सहीही आपली नसल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
आनंद कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून “मी स्वतः सदर मतदार (Voter) व्यक्ती आहे” हे स्पष्ट करूनही अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. उलट आतमध्ये बसलेल्या सात जणांना विचारले की तुम्ही यांना ओळखतात काय?
त्यांनी नाही सांगितल्यावर. हे सात लोक तुम्हाला ओळखत नाहीत.. त्यामुळे तुम्ही बाहेर निघा (Get Out) असे सांगून बाहेर काढले, असा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी तात्काळ बुथवरील निवडणूक विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दाखल करण्याची मागणी केली.
मात्र तक्रार घेण्यास स्पष्ट नकार (Denied) देण्यात आला, असेही समोर आले आहे. तक्रार नोंदवून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांनी, “तुम्हाला ओळखणारी व्यक्ती सोबत घेऊन या”, असे सांगितल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
कुलकर्णी म्हणाले, “मी माझे मूळ आधार कार्ड दाखवले, माझ्या ऐवजी दुसऱ्याच कुणीतरी मतदान केल्याचे स्पष्ट दिसत असतानाही माझी तक्रार घेण्यात आली नाही. हा माझ्या मतदानाच्या हक्काचा सरळसरळ भंग असून एक मतदार माझ्यावर अन्याय झाला आहे. जबाबदार निवडणूक अधिकाऱ्यांकडून (Polling Officer) अशी वागणूक अपेक्षित नव्हती, मग मतदारांनी न्याय कोणाकडे मागायचा” असे आनंद कुलकर्णी यांनी सांगितले.
या घटनेमुळे बूथ स्तरावर बोगस मतदान कसे घडले, याची चौकशी (Inquiry) करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून, निवडणूक प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.



