येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
श्रीरामपूर (अहिल्यानगर) - तालुक्यातील नायगाव येथे रविवारी दुपारी झालेल्या गँगवॉरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नवनिर्वाचित नगरसेवक अर्जुन दाभाडे याच्यासह १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून हल्ला झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
![]() |
| Image : AI Generated |
नायगाव (ता.श्रीरामपूर) शिवारात रविवारी दुपारी नगरसेवकासोबत आलेल्या टोळक्याने हातात गावठी कट्टे, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने खरेदीदारांना बेदम मारहाण केली. यावेळी जीव वाचवताना नीलेश एकनाथ शेंडगे (रा. नेवासे) या तरुणाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.
दोन दिवसांच्या शोधानंतर (दि. १३ जानेवारी रोजी) नीलेशचा मृतदेह हाती लागला. त्यामुळे या घटनेला आता गंभीर वळण मिळाले आहे. याप्रकरणी डीजे ऑपरेटर चेतन खाजेकर याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नवनिर्वाचित नगरसेवकासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यावरुन पोलिसांनी नगरसेवक दाभाडे, राहुल धुमाळ, सागर भोसले, विजु पवार, आसिफ कैची, अकील बिल्डर, मयूर शिर्के, राहुल चव्हाण, मेजर राणा आदींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या हल्ल्यात चेतनचा मामा नीलेश शेंडगे (रा. नेवासे) याचा मृत्यू झाला आहे.
खरे कारण वेगळेच? : फिर्यादीत म्हटल्यानुसार दाभाडे याने फिर्यादी खाजेकर व मामा शेंडगे यांना येथे जमीन खरेदी करायची नाही, असे धमकावल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जमीन खरेदीच्या वादातून हा प्रकार घडल्याची पोलिस दफ्तरी नोंद झाली आहे. मात्र, घटनास्थळी वाळू उपसा करणारा एक जेसीबी पाण्यात पडलेला आढळला. त्यामुळे वाळूतस्करीच्या वर्चस्वातून हे गँगवॉर झाल्याची कुजबुज या परिसरात आहे.
पुन्हा गँगवॉर भडकणार? : श्रीरामपुरात काही दिवसांपूर्वी भर दिवसा बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी बंटी जहागीरदार याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर नायगावात दाेन गटात गँगवॉरचा भडका उडाला. यातही गावठी पिस्तुलांचा सर्रास वापर झाला. या धुमश्चक्रीत एका युवकाचा बळी गेला. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पुन्हा गँगवॉर भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा : श्रीरामपूर तालुक्यात 'रक्तरंजित गॅंगवार, गोदावरीच्या पात्रात मृत्यूचे थैमान

