फक्त घोषणा नव्हे, आता कृती हवी! अहिल्यानगरला SUPER IT HUB बनवायचंच आहे का?

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगरमध्ये IT पार्कची चर्चा गेल्या दहा वर्षांपासून केवळ फाईल्स, बैठका आणि भाषणांपुरतीच मर्यादित राहिली आहे. प्रत्येक निवडणुकीत IT पार्क, रोजगार, तरुणाईचे भवितव्य यावर मोठमोठी आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात मात्र इच्छाशक्तीचा ठळक अभाव दिसतो.

प्रश्न साधा आहे, IT पार्क तयार असूनही देश-विदेशातील नामांकित IT कंपन्यांना अहिल्यानगरमध्ये येण्याचं एकत्रित निमंत्रण का दिलं जात नाही?

आज अहिल्यानगरचे सर्वच पक्षांचे खासदार, आमदार, पालक मंत्री आणि प्रतिष्ठित पुढारी एकत्र येऊन जर ठाम भूमिका घेतली, तर चित्र बदलू शकतं. पण दुर्दैवाने राजकीय मतभेद, गटबाजी आणि केवळ ‘टाइम पास’ धोरणामुळे शहराचा सुवर्णसंधी काळ हातातून निसटत चालला आहे.

तरुणाईचा प्रश्न गंभीर आहे. आज अहिल्यानगरची हुशार, तंत्रज्ञानस्नेही तरुणाई नोकरीसाठी पुणे, मुंबई, बेंगळुरू, हैदराबादकडे स्थलांतर करत आहे. हे थांबवायचं असेल, तर केवळ घोषणा नाही, तर 101% चौफेर प्रयत्न करावे लागतील.

कोणत्याही प्रकारचं छुपं किंवा उघड ब्लॅकमेलिंग न करता, पारदर्शक धोरण राबवून IT कंपन्यांना इथे येण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं ही काळाची गरज आहे.

अहिल्यानगरकडे क्षमता आहे..भौगोलिकदृष्ट्या अनुकूल स्थान, सुधारत असलेली कनेक्टिव्हिटी, शिक्षणसंस्था, कमी खर्चात मनुष्यबळ, हे सगळं अहिल्यानगरकडे आहे. कमी आहे ती एकत्रित राजकीय इच्छाशक्ती. जगातल्या अनेक प्रसिद्ध IT कंपन्या छोट्या शहरांतूनच उभ्या राहिल्या. मग अहिल्यानगर का नाही?

Super IT Hub City : स्वप्न नव्हे, गरज आहे : जर आजच ठोस पावलं उचलली नाहीत, तर उद्या अहिल्यानगर केवळ ‘संधी गमावलेलं शहर’ म्हणून ओळखलं जाईल. पण जर सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि समाज एकत्र आले, तर अहिल्यानगर जगाच्या नकाशावर SUPER IT HUB CITY म्हणून झळकू शकतं.

प्रश्न इतकाच आहे की आता तरी सगळे एकत्र येणार का? की पुढची दहा वर्षेही केवळ चर्चा आणि आश्वासनांतच जाणार?

- संजय बारस्कर (अहिल्यानगर)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !