मुंबई - महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakrey) यांनी कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित नगरसेवकांना उद्देशून सस्नेह संदेश देत संघर्ष अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
'अचाट धनशक्ती आणि सत्तेच्या ताकदीविरुद्ध शिवशक्तीची ही लढाई (Election) होती,' असे म्हणत त्यांनी मनसे आणि शिवसेनेच्या सर्व विजयी नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे.
अपेक्षित यश मिळाले नसले तरी पक्ष खचणाऱ्यातला नाही, असा ठाम सूर लावत राज ठाकरे म्हणाले की, निवडून आलेले नगरसेवक स्थानिक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. मराठी (Marathi) माणसाच्या विरोधात काही घडताना दिसले, तर त्याला जेरीस आणण्याची भूमिका ते घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची (Maharashtra) ही लढाई दीर्घकालीन असल्याचे अधोरेखित करत, त्यांनी कार्यकर्त्यांना संयम आणि सातत्य ठेवण्याचे आवाहन केले आहे.
'निवडणुका येतील जातील, पण आपला श्वास मराठी आहे हे विसरायचं नाही,' असे सांगत त्यांनी विशेषतः एमएमआर परिसरासह संपूर्ण राज्यात मराठी माणसाच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज अधोरेखित केली.
निवडणुकीतील त्रुटी, कमतरता आणि पुढील दिशा यांचे सखोल विश्लेषण सर्वांनी मिळून केले जाईल, असे स्पष्ट करत राज ठाकरे यांनी 'लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया,' असे म्हणत संघटनात्मक बांधणीला गती देण्याचे संकेत दिले आहेत.
या संदेशामुळे आगामी काळात मनसेकडून मराठी मुद्द्यांवर अधिक आक्रमक भूमिका आणि संघटन विस्ताराची रणनीती आखली जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

