शेवगाव (अहिल्यानगर) - केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (निपा) यांच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित ‘यशस्वी शालेय नेतृत्व’ या राष्ट्रीय परिषदेसाठी (National Conference) वाघोली येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेची (ZP School) निवड झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातून ही एकमेव शाळा असून, महाराष्ट्रातून निवड झालेल्या केवळ चार शाळांमध्ये वाघोलीच्या शाळेचा समावेश आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका (Headmistress) शोभा मंडलिक यांनी ‘विकसित भारत संकल्पना २०४७’ अंतर्गत 'यशस्वी शालेय नेतृत्व : एकविसाव्या शतकातील परिवर्तनात्मक मार्ग' या विषयावर भारत आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली (New Delhi) येथे १७ ते १९ जानेवारी दरम्यान शाळेच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण केले.
लोकसहभागातून साधलेल्या शाळेच्या विकासावर आधारित, उपक्रमशील शिक्षक उमेश घेवरीकर व दादा नवघरे यांनी तयार केलेल्या डॉक्युमेंटरीचीही (Documentary) राष्ट्रीय स्तरावर (National Level) निवड झाली.
देशभरातून आलेल्या ३०० हून अधिक डॉक्युमेंटरींपैकी महाराष्ट्रातील केवळ चार, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील ही एकमेव डॉक्युमेंटरी ठरली. परिषदेत मान्यवरांनी या सादरीकरणाचे विशेष कौतुक (Appreciate) केले.
वाघोली ग्रामविकासाचे संकल्पक उमेश भालसिंग व सरपंच सुश्मिता भालसिंग यांच्या पुढाकारातून पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने शाळेत विविध भौतिक व शैक्षणिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
या उल्लेखनीय निवडीबद्दल जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, डायटचे प्राचार्य राजेश बनकर, गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ व केंद्रप्रमुख रघुनाथ लबडे यांनी वाघोली शाळेचे अभिनंदन केले आहे.
वाघोली शाळेच्या या यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीला राष्ट्रीय स्तरावर मानाची दाद मिळाली आहे. शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
