येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Rahuri Assembly by-Elections) पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे राजकीय (Political Drama) वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने (VBA) पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रस्थापित घराणेशाहीच्या राजकारणाला तगडे आव्हान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे (Yogesh Sathe) यांनी यासंदर्भात पक्षाची (Political Party) भूमिका स्पष्ट केली. राहुरी आणि नगर तालुक्यातील ग्रामीण भागांत अनेक दशकांपासून असलेल्या प्रस्थापित राजकीय वर्चस्वाला छेद देण्यासाठी 'वंचित'ने आपली रणनीती आखली आहे.
साठे यांच्या मते, मतदारसंघातील बहुजन, मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा हिशोब चुकता करण्याची हीच योग्य वेळ आहे. सामान्यांचा आवाज दबला जाऊ नये, यासाठी पक्ष लवकरच आपला 'जनतेचा उमेदवार' रिंगणात उतरवणार आहे.
वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीसाठी काही कळीचे मुद्दे समोर ठेवले आहेत:
- संविधानिक अंमलबजावणी : वंचितांवरील अन्याय रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करणे.
- शेतकरी हित : साखर कारखानदारीतील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना उसाचा योग्य दर मिळवून देणे.
- राजकीय प्रतिनिधित्व : घराणेशाही मोडीत काढून सामान्य कुटुंबातील तरुण, ओबीसी आणि गरीब मराठा उमेदवारांना सत्तेत वाटा देणे.
- सामाजिक सलोखा : निवडणुकीच्या काळात होणाऱ्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला विरोध करून सर्व समाजांत सुरक्षिततेची भावना निर्माण करणे.
बूथ स्तरावर संघटनात्मक बांधणी : प्रस्थापितांकडे मोठी साधनसामग्री असली, तरी वंचित बहुजन आघाडीने राहुरी मतदारसंघातील प्रत्येक बूथवर आपली सक्षम संघटनात्मक बांधणी पूर्ण केल्याचा दावा साठे यांनी केला आहे. आमचे कार्यकर्ते कोणत्याही दबावाला किंवा प्रलोभनाला बळी न पडता मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत, असेही त्यांनी नमूद केले. या भूमिकेमुळे राहुरीची आगामी पोटनिवडणूक बहुरंगी आणि चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

