याला काही इतिहास नाही. संतांनी याच्याबद्दल भरभरून लिहिले आहे, अभंगातून तो आपल्याला कळत राहतो. इतर देव कसे व्हीआयपी (VIP) आहेत, तसा हा नाही. तो सामान्यांचा जिवलग आहे, लोकाभिमुख (People-centric) आहे. स्पृश्य, अस्पृश्य या मानवाने केलेल्या भेदापलिकडे जाऊन तो लोकांचा आहे.
पंढरपूरमध्येच का थांबला असेल असं वाटत राहतं, तेव्हा उमगतं—भक्तीचे निराकार, निर्गुण रूप त्याला भावले म्हणून पुंडलिक प्रेमाखातर तो युगानुयुगे इथे उभा आहे, एका वीटेवर! विटेवर उभा म्हणूनी तो विठ्ठल झाला. त्याच्याजवळ फक्त प्रेम आणि प्रेम आहे. साध्या-भोळ्या भक्तांसाठी तो फक्त प्रेम आहे, सहज भेटणारा...
याला कठोर व्रतवैकल्ये करावी लागत नाहीत. हा कुणाकडून काही मागत नाही, याच्या आधी भक्ताच्या नावाचा जयघोष होतो म्हणून कोपतही नाही. नवसासायासाची इथे भानगडच नाही हो! तो आपल्या भक्तांचा जिवलग आहे, मित्र आहे, सखा विठ्ठल आहे.
त्याच्याशी फक्त डोळाभेट व्हावी म्हणून वारीची (Wari Tradition) ही परंपरा शेकडो वर्षे चालू आहे. तुम्ही त्याच्यावर रागवूही शकता, ‘विठ्या-विठ्या’ असं म्हणूही शकता.! जनीला दळणकांडणात मदत करणारा, नाथांच्या घरचा हा श्रीखंड्या आपला वाटतो प्रत्येकाला.!
आमच्या-तुमच्या मनातल्या हा विठ्ठल मोकळा-ढाकळा आहे. देव आहे म्हणून घमेंडही नाही, षोडशोपचारांच्या (Shodshopachar Puja) पूजेचे अवडंबर नाही. भक्तांच्या भेटीसाठी आसुसलेला, भक्ताने हक्काने दिलेल्या साध्या वीटेवर पंढरपुरात युगानुयुगे पुंडलिकसाठी थांबणारा तो विठ्ठल.!
देवभक्तीपेक्षा आईवडिलांची सेवा महत्त्वाची, हे जाणून, उमगून, भक्ताला समजून घेणारा...! देवांची अनेक मंदिरे आहेत, सोन्याचे कळस चढवलेले आहेत, महागड्या उपचारांच्या पूजा आहेत... व्हीआयपी पास (VIP Passes) आहेत... सिंहासने आहेत... इथे फक्त करकमले कंबरेवर ठेवून तो उभा आहे, युगानुयुगे... असं वाटतं, ते हात आता वर येऊन भक्ताला मिठीत घेतील.
पुंडलिकने वीटेवर थांबायला सांगितले म्हणून तो विठ्ठल झाला... त्याने फक्त प्रेम जाणलं, म्हणून तो पंढरपूर सोडून अजूनही गेलाच नाही! दूरवर उभ्या राहिलेल्या राखी-रुक्मिणीला (Rakhumai) हेही भोळ्या भक्तीचे रूप दाखविण्यासाठी तो पंढरपुरी आहे अजूनही तिथेच.!
आपला, तुमचा, माझा विठू....!!! पंढरपूर नुसतं चंद्रभागेच्या तीरावर वसलेलं गाव नाही, तर देवाला आपल्या भोळ्या भक्तीने थांबवणारे गाव आहे... बरोबर आहे ना मंडळी?
- स्वप्नजा घाटगे, कोल्हापूर

